पुणे : आर्य संगीत प्रसारक मंडळाच्या वतीने दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाला आजपासून सुरुवात झाली. पुण्यातील मुकुंदनगर येथील महाराष्ट्रीय मंडळाचे क्रीडासंकुल या ठिकाणी १८ ते २२ डिसेंबर दरम्यान ७० वा सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सव रंगणार आहे.
७० व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाला सुरुवात : परंपरेप्रमाणे जंगली महाराज रस्त्यावरील संभाजी उद्यानातील सवाई गंधर्वांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करीत ७० व्या सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सवाला आज सुरुवात झाली. यावेळी आर्य संगीत प्रसारक मंडळाचे विश्वस्त श्रीनिवास जोशी, शिल्पा जोशी, विराज जोशी, शुभदा मुळगुंद, पं. उपेंद्र भट, आनंद भाटे, डॉ. प्रभाकर देशपांडे, मिलिंद देशपांडे, शैला देशपांडे असे मान्यवर उपस्थित होते. महोत्सवाच्या प्रारंभीच नुकत्याच दिवंगत झालेल्या उस्ताद झाकीर हुसैन, पं. रामनारायण आणि उस्ताद राशीद खाॅं या जगविख्यात कलाकारांच्या आठवणी जागवण्यात आल्या.
वादनाला सुरूवात : एस. बालेश आणि डॉ. कृष्णा बालेश भ्रजंत्री यांनी शहनाईवादनाने सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सवाचा सुरेल प्रारंभ केला. समयोचित अशा राग मधुवंतीनं त्यांनी वादनाला सुरूवात केली. त्यानंतर 'वैष्णव जन तो' ही भक्तीरचना आणि मिश्र खमाज मधील धून सादर करून त्यांनी वादनाची सांगता केली. त्यांना प्रसाद लोहार (तबला), प्रकाश बालेश (दुग्गड), आर. के. रवीकुमार (स्वरमंडल), विनायक (तानपुरा) यांनी साथ केली.
युवा गायिकेची हजेरी : शाश्वती चव्हाण झुरुंगे यांचे सवाईच्या स्वरमंचावरील पहिले सादरीकरण झाले. पं. शिवानंद स्वामी, पद्मा देशपांडे, मशकूर अली खाँ आणि वडील पं. सुधाकर चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभलेल्या युवा गायिका शाश्वती यांनी राग मुलतानी मधील या बंदिशीने सुरूवात केली. त्यांना गंगाधर शिंदे (हार्मोनिअम), कार्तिकस्वामी (तबला), गंभीर महाराज (पखवाज), श्रेया व श्रावणी यांनी तानपुरा साथ केली.
हेही वाचा -