मुंबई : विधानसभेच्या निकालावर अनेकांनी शंका उपस्थित केल्या आहेत. खासदार संजय राऊत यांनी थेट हा निकाल आम्हाला मान्य नसल्याचं म्हटलं होतं. तर, पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनीही हा निकाल महाराष्ट्राच्या जनतेला मान्य आहे का? असा सवाल करत ईव्हीएमवर संशय व्यक्त केला होता. आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी 'हे पाहा अन् तुम्हीच ठरवा' अशा आशयाची एक पोस्ट करत सत्ताधारी पक्षातील 12 विजयी आमदारांच्या मतांची आकडेवारी शेअर केली.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला सर्वात कमी जागा : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हा पक्ष यंदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडी व महायुतीमधील संख्याबळात सर्वात कमी संख्याबळ असलेला पक्ष ठरला. विधानसभा निवडणुकीत केवळ 10 जागांवर विजय मिळाला. त्यानंतर सर्वच पराभूत आमदारांची बैठक घेण्यात आली होती. त्यामध्ये, बहुतांश आमदारांनी ईव्हीएममवर संशय घेत निकालावर नाराजी व्यक्त केली. सर्वच उमेदवारांनी निवडणुकीचे निकाल धक्कादायक असल्याची भूमिका मांडली.
जितेंद्र आव्हाड यांची पोस्ट : आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देखील ईव्हीएमबाबत रोष व्यक्त केला आहे. त्यांनी महायुतीतील विजयी आमदारांच्या नावांची आणि त्यांना मिळालेल्या मतांची यादीच शेअर केली. 'हे बघा आणि तुम्हीच ठरवा, EVM ची कमाल' अशा आशयाची पोस्ट करत ईव्हीएमच्या निकालावर थेट संशय व्यक्त केला.