मुंबई - अजय देवगण, आमान देवगण आणि राशा थडानी यांच्या बहुप्रतीक्षित 'आझाद' चित्रपटाचा ट्रेलर आज रिलीज करण्यात आलाय. आझाद या उमद्या घोड्याला केंद्रीत धरुन सुरुवात झालेल्या या ट्रेलरमध्ये अजय देवगण नेहमी प्रमाणे जबरदस्त अॅक्शनमोडमध्ये दिसत असून आमान आणि राशाची केमेस्ट्री आकर्षक दिसत आहे. दिग्दर्शक अभिषेक कपूरचा हा चित्रपट 17 जानेवारीला रिलीज होणार आहे.
अजय देवगणचा पुतण्या आमान आझाद आणि रवीना टंडनची मुलगी राशा थडानी या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहेत. दोन स्टार किड्स या चित्रपटात झळकणार असल्यामुळे तमाम फिल्म इंडस्ट्रीच्या नजरा या चित्रपटावर खिळल्या आहेत. एक आकर्षक कथानक, पडद्यावर एक फ्रेश जोडीसह अवतरणार असून अजय देवगण, डायना पेंटी आणि मोहित मलिक त्यांना साथ देत आहेत.
अजय देवगणनं त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर आझादचा ट्रेलर पोस्ट केला आहे. याच्या कॅप्शनमध्ये त्यानं लिहिलंय, "कुच्छ रिश्ते हम चुनते है, और कुच्छ हमें..." असं म्हणत त्यांनी काळ्या अश्वाचा इमोजी टाकलाय. "साहसाचे साक्षीदार होण्यासाठी 17 जानोवारीला मोठ्या पडद्यावर आझाद पाहा," असं त्यानं पुढं लिहिलंय.
'काइ पो चे', 'केदारनाथ', 'रॉक ऑन' आणि 'चंडीगढ़ करे आशिकी' सारख्या चित्रपटांसाठी ओळखला जाणारा अभिषेक कपूर या आझाद चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहे. बॉलिवूडचे दिग्गज निर्माता रॉनी स्क्रूवाला आणि प्रज्ञा कपूर यांची निर्मिती असलेला, 'आझाद' हा चित्रपट नव्या वर्षाचं मोठं आकर्षण असणार आहे.
प्रसिद्ध अभिनेत्री रवीना टंडन आणि निर्माता अनिल थडानी यांची मुलगी राशा थडानी आझाद या थ्रिलर चित्रपटासह सिनेक्षेत्रात पाऊल ठेवण्यासाठी सज्ज झाली आहे. अभिषेक कपूर दिग्दर्शित, या चित्रपटाने आधीच चर्चा निर्माण केली आहे कारण राशा थडानी अजय देवगणचा पुतण्या आमन देवगणसोबत स्क्रीन स्पेस शेअर करणार आहे. राशाचे बॉलिवूडमधील मजबूत घराणे आणि तिच्या आईचे स्टारडम लक्षात घेता, राशाचे पदार्पण हे बहुप्रतिक्षित आहे. तर आमान याच्यासाठी 'आझाद' हा प्रोजेक्ट खास असणार आहे. तो देवगण कुंटुंबातील असल्यामुळं त्याच्याकडून खूप मोठ्या अपेक्षा आहेत.