बीड : परभणी येथे भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला, तसंच संसदेत गृहमंत्री अमित शाह यांनी भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत एक विधान केलं होतं. या दोन्ही घटनेच्या निषेधार्थ आज बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर 'संविधान बचाव जनआक्रोश मोर्चा' काढण्यात आला.
अल्पसंख्यांक समाजावर अन्याय : डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून मोर्चाला सुरुवात झाली. सुभाषरोड मार्गे अण्णाभाऊ साठे चौक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा धडकला. या मोर्चामध्ये सर्वपक्षीय शेकडो लोक सहभागी झाले. ज्यावेळी राज्यामध्ये आणि देशामध्ये भाजपाप्रणित सरकार येतं त्यावेळी सर्वधर्म समभाव असलेल्या संविधानाची पायमल्ली केली जाते. यामध्ये दलित, मुस्लिम आणि ओबीसी, अशा अल्पसंख्याक सर्व समाजांवर अन्याय केला जातो. त्यामध्ये नितीन आगे प्रकरण, खैरलांजी प्रकरण असेल किंवा केज तालुक्यातील मांगवडगाव येथील तिहेरी हत्याकांड प्रकरण असेल, या सर्व समाजावर अन्याय करण्याचं काम भाजपा सरकार करत आहे. त्यांच्या विरोधामध्ये आता आंबेडकरवादी संघटना रस्त्यावर उतरली असल्याची माहिती आंदोलन के. के. वडमारे यांनी दिली.
अमित शाह यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा : संसदेमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जो अमित शाह यांनी अपमान केला आहे, त्याप्रकणी स्वतः संसदेच्या अध्यक्षांनी त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे आणि त्यांना जेलमध्ये टाकलं पाहिजे होतं. परंतु, या ठिकाणी असलेली पूर्ण सिस्टीम ही मनुवादी आहे, जातीयवादी आहे. परभणीत सोमनाथ सूर्यवंशी यांचा जो पोलिसांनी पोलीस कोठडीत खून केला आहे. त्याच्या निषेधार्थ हा मोर्चा काढण्यात आल्याची माहिती, आंदोलक प्रशांत वासनिक यांनी दिली.
संविधान वाचवण्यासाठी काढला मोर्चा : परभणी येथील संविधान चौकाची जी विटंबना झाली, परभणीमध्ये अकरा तारखेला जो बंद झाला त्यादरम्यान या बंदमध्ये नसलेले सोमनाथ सूर्यवंशी यांना पकडण्यात आलं आणि त्यांचा जेलमध्ये मृत्यू झाला. तर सोमनाथ सुर्यवंशीच्या हत्येस जबाबदार पोलिसांवर गुन्हे दाखल करावा. त्याचबरोबर अमित शाह यांनी संसदेमध्ये जे वक्तव्य केलं आहे, यासंदर्भात त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी सर्व आंबेडकरी संघटनांच्यावतीनं करण्यात आली. आजचा हा मोर्चा संविधान वाचवण्यासाठी काढण्यात आलेला आहे. यामध्ये सर्वच आंबेडकरवादी संघटना मोठ्या संख्येने सहभागी झाल्याची माहिती आंदोलक बबन वडमारे यांनी दिली.
हेही वाचा -