मुंबई CM Eknath Shinde Exclusive : लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात मतदानाची प्रक्रिया पूर्ण झालीय. यानंतर आता प्रत्येक राजकीय पक्ष आपापली आकडेमोड करत विजयाचं गणितं मांडत आहे. या लोकसभा निवडणुकीनंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खास ईटीव्ही भारत नेटवर्कसाठी ईटीव्ही भारत-महाराष्ट्रचे संपादक सचिन परब यांना 'एक्स्लुसिव्ह' मुलाखत दिली. यात त्यांनी नरेंद्र मोदी हेच देशाचे तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील, असा विश्वास व्यक्त करत उद्धव ठाकरे आणि विरोधकांवर जोरदार टीका केली. आपल्या या रोखठोक मुलाखतीत शिंदे यांनी 'इंडिया' आघाडी सत्तेत आल्यास भाजपाप्रणित एनडीएच्या नेत्यांना तुरुंगात डांबणार, या काँग्रेस नेता राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याची खिल्ली उडवली. मुख्यमंत्र्यांचे खासदार पुत्र डॉ. श्रीकांत शिंदे हे लंडन येथे सुट्टीचा आनंद घेत आहेत. आपण लंडनवारी का टाळली? नरेंद्र मोदी हे आपल्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात पहिल्यांदाच मुंबईतल्या रस्त्यावर का उतरले, याचंही कारण त्यांनी सांगून टाकलं. विशेष म्हणजे "ज्याप्रमाणे तुम्ही उद्धव ठाकरे यांच्याविरोधात बंड केलं, त्याप्रमाणे तुमच्याविरोधात कुणी बंड केलं तर काय कराल?" या प्रश्नाचं सुद्धा त्यांनी दिलखुलास उत्तर दिलं.
आमचं काम पाहून लोक आम्हाला साथ देतील :यावेळी निवडणुकीत विजयाचा विश्वास व्यक्त करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, "पाच टप्प्यांत निवडणुका असल्यानं व्यग्र होतो. मला विश्वास आहे, आमच्या सरकारनं दोन वर्षांत केलेली अनेक विकासकामं मग ते मेट्रो प्रकल्प, बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग, मुंबईतील काँक्रिट रोड, अटल सेतू अशी कामं केली आहेत. तसंच सरकारनं शेतकरीवर्ग, तरुणवर्ग आणि महिलांसाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत. मोदी सरकारनंही कामं केली आहेत. ते काँग्रेसला शक्य झालं नाही. लोक कामाला प्राधान्य देतात. त्यामुळं महाराष्ट्रात 40 पेक्षा जास्त जागा महायुतीला मिळतील असा विश्वास आहे." तसंच, आमचं सरकार स्थापन होण्यापूर्वी महाराष्ट्र जीडीपीत आणि एफडीआयमध्ये मागे होतं. आमचं सरकार आल्यानंतर जीडीपीत क्रमांक एक आणि एफडीआयमध्ये पुढे आला. पूर्वी उद्योग पळून जात होते. आता येत आहेत. आमचं सरकार आल्यानंतर चांगले बदल झाले आहेत. आम्ही उद्योगांना प्रोत्साहन दिलं, एकखिडकी मंजूरी दिली, रेड कार्पेट दिलं. आमच्याकडं चांगल्या पायाभूत सुविधा, मनुष्यबळ आहे. आम्ही राज्य विकासाकडं नेत असून डबल इंजिन सरकारमुळं प्रोत्साहन मिळत आहे," असा दावा मुख्यमंत्र्यांनी केलाय. घरी बसून फेसबुक लाईव्ह केल्यानं मतदान मिळत नाही, असा टोलाही त्यांनी उद्धव ठाकरेंना लगावलाय.
पंतप्रधानांनी रोड शो करु नये असा कायदा आहे का?: 'अबकी बार चार सौ पार' असा नारा देत भाजपा लोकसभा निवडणुकीला सामोरी जात आहे. मात्र ही निवडणूक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी फार सोपी जाणार नाही, असा राजकीय विश्लेषकांचा अंदाज आहे. मोदींना आपला विजय निश्चित करण्यासाठी अक्षरशः रस्त्यावर उतरावं लागलं, अशी टीका विरोधकांनी केली. त्याला उत्तर देताना, ''पंतप्रधानांनी रोड शो करु नये असा कायदा आहे का?" असा प्रतिप्रश्न मुख्यमंत्र्यांनी विचारला. "मोदींना लोकांची पसंती आहे. जेव्हा आम्ही मोदींना बोलावतो तेव्हा ते आनंदानं येतात. कारण, त्यांनाही विकास आवडतो. लाखो लोक त्यांना पाहण्यासाठी येतात. विरोधकांना रस्त्यावर आणण्यासाठी पंतप्रधान रस्त्यावर उतरले आहेत." या शब्दांत त्यांनी विरोधकांवर 'शरसंधान' केलं.
संविधान बदलणार का?:एनडीए सरकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेलं संविधान बदलणार असा आरोप विरोधकांकडून भाजपा नेत्यांच्या वक्तव्याचा दाखला देत केला जातो. यावर उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांकडं मुद्दे नसल्याचा दावा करत, बाबासाहेबांमुळे देश चालतो. बाबासाहेबांच्या संविधानामुळे पंतप्रधान झाल्याचं मोदी सांगतात. काँग्रेसनं दोनवेळा बाबासाहेब यांना निवडणुकीत हरवलं. जोपर्यंत चंद्रसूर्य आहे, तोपर्यंत संविधान कायम राहणार आहे. काँग्रेसनं 82 वेळा घटना बदलल्याचा आरोप करत मुख्यमंत्र्यांनी भाजपा सत्तेत आल्यास संविधान बदलेल या विरोधकांच्या आरोपाला प्रत्युत्तर दिलंय. पंतप्रधान मोदी देशाची प्रगती करुन महासत्ता करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. विरोधक विदेशात जाऊन देशाची बदनामी करतात. हेमंत करकरे, अशोक कामटे यांच्या हौतात्म्याबाबत शंका व्यक्त करतात. हा त्यांचा अपमान आहे. विरोधक मोदींना हरवणार असं सांगतात. मात्र 2014 मध्ये त्यांचा सुपडासाफ झाला, आताही त्यांची तीच अवस्था होईल, अशीही प्रतिक्रिया त्यांनी दिली.