महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / politics

BRS Party in Maharashtra : तेलंगणातील सत्ता जाताच 'बीआरएस'ची कार महाराष्ट्रात 'पंक्चर', कार्यकर्त्यांसह नेत्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश - lok sabha elections 2024

BRS Party in Maharashtra : तेलंगणा विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर भारत राष्ट्र समितीला (बीआरएस) महाराष्ट्रातही धक्का बसला आहे. बीआरएसच्या महाराष्ट्रातील अनेक पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत मंगळवारी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केलाय.

BRS Party: तेलंगणा विधानसभेतील पराभवाचा 'केसीआर' यांना फटका; राज्यात 'बीआरएस'ची कार 'पंक्चर'
BRS Party: तेलंगणा विधानसभेतील पराभवाचा 'केसीआर' यांना फटका; राज्यात 'बीआरएस'ची कार 'पंक्चर'

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 20, 2024, 7:17 AM IST

माणिकराव कदम

मुंबईBRS Party in Maharashtra : तेलंगणा राज्यात दहा वर्षापांसून भारत राष्ट्र समिती (बीआरएस) पक्ष सत्तेत होता. मात्र, नुकत्याच पार पडलेल्या तेलंगणा विधानसभा निवडणुकीत पक्षाचा दारुण पराभव झाल्यामुळं बीआरएसनं सत्ता गमाविली. त्यामुळं महाराष्ट्रातही या पक्षाला गळती लागलीय. महाराष्ट्रातील बीआरएस पक्षाचे नेते माणिकराव कदम यांच्यासह असंख्य पदाधिकाऱ्यांनी बीआरएस पक्षाला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षात प्रवेश केलाय.


तेलंगणात पराभवाचा फटका : तेलंगणा राज्यात सत्तांतर झाल्यानंतर महाराष्ट्रात असलेल्या भारत राष्ट्र समिती पक्षाचे कार्यालय बंद होण्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. या पार्श्वभूमीवर गेल्या पंधरा दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील बीआरएस पक्षाच्या प्रमुख नेत्यांची बैठक छत्रपती संभाजीनगर इथं पार पडली होती. या बैठकीमध्ये पक्षाचं काम राज्यात सुरू ठेवायचं की बंद करायचं याबाबत आम्हाला अवगत करावं, अशा प्रकारचा ठराव या बैठकीत करण्यात आला होता. हा ठराव केसीआर यांना पाठवण्यात आला होता. मात्र, यावर केसीआर यांच्याकडून कोणताही प्रतिसाद आला नाही, असा बीआरएसच्या राज्यातील पदाधिकाऱ्यांकडून दावा करण्यात आला.

अजित पवारांचं घड्याळ हाती : कोणती भूमिका घ्यायची यासंदर्भात कोणतेही निर्देश किंवा सूचना केसीआर यांच्याकडून न आल्यामुळं राज्यातील बीआरएस पक्षातील कार्यकर्ते आणि पदाधिकारी संभ्रमात होते. पक्षाचं काम करायचं का नाही, याबाबत त्यांना माहिती मिळत नव्हती. अखेर बीआरएस पक्षाचे नेते माणिकराव कदम यांच्यासह असंख्य पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी बीआरएस पक्षाला सोडचिठ्ठी दिली. उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी माणिकराव कदम यांची राष्ट्रवादी काँग्रेस किसान सेलच्या राज्य प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आलीय.


केसीआर यांचा भेटण्यास नकार : भारत राष्ट्र समिती अर्थात बीआरएस पक्षाला महाराष्ट्रात कशामुळं ओहोटी लागली याविषयी 'ईटीव्ही भारत'सोबत बोलताना माणिकराव कदम म्हणाले की, "बीआरएस पक्षाची तेलंगणा राज्यातील सत्ता गेल्यानंतर आम्ही केसीआर यांना भेटण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांना भेटायची इच्छा नसल्याचं सांगितलं. महाराष्ट्रात बीआरएस पक्षाचा विस्तार करत असताना आम्ही दोन माजी खासदार आणि 12 माजी आमदार जोडले होते. मात्र केसीआर यांनी कोणतीही भूमिका घेण्यास असमर्थता दाखवल्यामुळं सगळेच संभ्रमात होतो. त्यामुळं बीआरएस पक्षाला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलाय."

हेही वाचा :

  1. ED Arrests BRS MLC Kavita : के. कविता यांना ईडीनं केली अटक, दिल्ली दारू घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई
  2. तेलंगाणात काँग्रेसला स्पष्ट बहुमत; 'बीआरएस'च्या कारला लागला ब्रेक, भाजपाचाही वाढला आकडा

ABOUT THE AUTHOR

...view details