पालघर Hitendra Thakur Allegation : "गेल्या दहा वर्षात पालघरमध्ये विकासाचं कोणतंही काम झालेलं नाही. आम्ही आता हा अनुशेष भरून काढणार आहोत. रोजगार, रेल्वे, आदिवासींचे अनेक प्रश्न आम्ही मार्गी लावणार आहोत. आमची धास्ती भाजपानं घेतली असून लोकसभा निवडणुकीसाठी शंभर कोटी रुपयांची खंडणी वसूल केली आहे," असा गंभीर आरोप बहुजन विकास आघाडीचे नेते आमदार हितेंद्र ठाकूर यांनी केलाय. त्यामुळं राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलंय.
आमची धास्ती घेतल्यानं अख्ख मंत्रिमंडळ पालघरमध्ये :पुढं ते म्हणाले की, "हे कसलं सरकार? आमची धास्ती घेतल्यानं अख्ख मंत्रिमंडळ पालघरमध्ये येऊन बसलंय. विविध समाजाच्या मंत्र्यांना आणि देशपातळीवरच्या नेत्यांना इथं आणून ठेवलंय. आमची पारंपरिक लढत भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना या दोघांशी होती. 2014 मध्येच पालघर लोकसभा मतदारसंघांमध्ये भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेत घटस्फोट झाला. परंतु, राज्यात 287 जागा या दोन्ही पक्षांनी परस्परांविरोधात लढवल्या असताना माझ्या विरोधात मात्र ते एकत्र आले."
त्यांना हनिमूनला पाठवण्याची वेळ : "त्यांच्यात कधी घटस्फोट होतात. कधी एकत्र येतात, हे त्यांचं त्यांनाच माहीत आहे. आता त्यांना स्वित्झर्लंडला किंवा अन्य कुठं पाठवण्याची वेळ आलीये. खरंतर मी कुणावरही आरोप करत नाही. परंतु त्यांनी केलेला आरोपांना उत्तर द्यावं लागतं. ते खालच्या भाषेत बोलतात. मला खालची भाषा येत नाही, असा गैरसमज त्यांनी करून घेऊ नये", असा इशाराही ठाकूर यांनी दिलाय.
वीस तारखेपर्यंतचे पाहुणे : "पालघर लोकसभा मतदारसंघात आमची त्यांनी इतकी धास्ती घेतलीय की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, गुजरातसह राजस्थानचे मंत्री अशा सर्वांना त्यांनी इथं आणून ठेवले आहे. वीस तारखेपर्यंत ते पाहुणे असतील. त्यानंतर फक्त राजेश पाटील हेच खासदार म्हणून दिसतील, असा दावा त्यांनी केला. तसंच यावेळी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावर शंभर कोटी रुपये खंडणी जमा केल्याचा आणि त्यासाठीच हॉटेलमध्ये बैठका घेतल्याचा गंभीर आरोपही ठाकूर यांनी केला. त्यासाठी त्या हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्याची मागणीही त्यांनी केली.
आरोप सिद्ध करा, अन्यथा कायदेशीर कारवाई करू : भारतीय जनता पक्षाच्या वतीनं पत्रकार परिषद घेऊन ठाकूर यांना पुरावे सिद्ध करण्याचे आव्हान देण्यात आलंय. "बहुजन विकास आघाडीच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे. यामुळं ठाकूर यांना हतबलता आणि नैराश्य आलंय. त्यातून ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावर बेछूट आणि निराधार आरोप करत आहेत, " अशा शब्दांत भाजपाचे वसई निवडणूक प्रमुख मनोज पाटील यांनी ठाकूर यांना प्रत्युत्तर दिलं. " ठाकूर यांनी केलेले आरोप सिद्ध करावेत, त्यांनी माफी मागावी. अन्यथा आम्ही त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करू," असा इशाराही पाटील यांनी यावेळी दिलाय.
हेही वाचा -
- "पालघर जिल्ह्याचं वाटोळं झालं तरी चालेल, पण निवडणुकीसाठी ...", हितेंद्र ठाकूर यांचा पालकमंत्र्यांवर गंभीर आरोप - Hitendra Thakur
- "मुंबई लुटणार्या घोटाळेखोरांना...", देवेंद्र फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर जोरदार टोलेबाजी - Devendra Fadnavis
- केतन तिरोडकर यांना अटक ; ड्रग्ज माफियांवरुन देवेंद्र फडणवीसांवर केले होते गंभीर आरोप - Ketan Tirodkar Arrested