मुंबई/नवी दिल्ली : विधानसभा निवडणुकीच्या निकालात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. त्यामुळं राज्यात आता महायुतीतून कोण मुख्यमंत्री होणार? यावर जोरदार चर्चा सुरू आहेत. महायुतीच्या नेत्यांमध्ये बैठकांचं सत्र सुरू आहे. आपला नेता मुख्यमंत्री व्हावा, अशी सर्वच नेत्यांची, कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे. अशातच केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलेल्या एका विधानानं शिवसेनेचे नेते आक्रमक झाले आहेत.
रामदास आठवले नेमकं काय म्हणाले? :"देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्याचं भाजपाच्या नेतृत्वानं ठरवलं आहे. याआधी एकनाथ शिंदे यांना अडीच वर्षासाठी मुख्यमंत्रीपद दिलं होतं. त्यामुळं आता भाजपानं हे पद घ्यावं, अशी भाजपाच्या वरिष्ठांची इच्छा आहे. या निर्णयामुळं एकनाथ शिंदे हे नाराज असल्याची माहिती मिळत आहे. आम्ही त्यांची नाराजी दूर करणार आहोत. महायुतीच्या विजयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मोठा वाटा आहे. त्यांनी दिल्लीच्या राजकारणात येऊन म्हणजे राष्ट्रीय राजकारणात योगदान द्यावं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच होतील," असं वक्तव्य रामदास आठवले यांनी केलं. त्यांच्या या वक्तव्यावर शिवसेनेकडूनही जशाच तसे प्रत्युत्तर देण्यात आलं आहे.
यांचा यात काहीच रोल नाही : रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री हा भाजपाचाच होणार आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार असं वक्तव्य केल्यानंतर यावर शिवसेना पक्षातून प्रतिक्रिया उमटत आहेत. "रामदास आठवले नेमकं काय बोलले, मला माहिती नाही. मात्र, मुख्यमंत्रिपदाबाबत अजून कोणाचेही नाव निश्चित झालेलं नाही. मुख्यमंत्रिपदाबाबतचा सर्वस्वी निर्णय तिन्ही पक्षाचे प्रमुख बसून एकत्र घेतील," अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे आमदार संजय शिरसाठ यांनी दिली. "मुख्यमंत्रिपदाबाबतच्या प्रक्रियेत रामदास आठवले यांचा रोल काहीच नाही. जर त्यांचा रोल काहीच नाही, तर ते अशी वक्तव्य का करत आहेत? मला माहिती नाही," असा टोलाही संजय शिरसाट यांनी रामदास आठवलेंना लगावला.
चर्चा करून तोडगा निघेल :"मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असेल? याबाबत आमचे तीन नेते एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे एकत्र बसून यावर चर्चा करतील. काहीही असो, त्यांनी जो निर्णय घेतला तो महायुतीच्या सर्व आमदारांना मान्य होईल आणि तोच निर्णय अमलात येईल. आपल्याच पक्षाच्या नेत्याला मुख्यमंत्रिपद मिळावं, असे प्रत्येक पक्षाला वाटतं. तुम्ही मला विचाराल तर एक शिवसैनिक म्हणून मी म्हणेन की, आमचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपद मिळावं. पण तिन्ही नेते एकत्र बसतील व चर्चा करून तोडगा निघेल," अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते शंभूराज देसाई यांनी दिली.