मुंबई-महाविकास आघाडीला संपूर्ण महाराष्ट्रात १८ पेक्षा जास्त जागा मिळाल्या तर राजकारणातून संन्यास घेणार, अशी घोषणा करणारे भाजपाचे आमदार आणि मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार सोशल मीडियावर ट्रोल होत आहेत. तुम्ही आता कधी राजकीय सन्यांस घेणार, असा सवाल महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून विचारला जात आहे. तसेच सोशल मीडियावर अनेक वापरकर्ते आशिष शेलारांची खिल्ली उडवित आहेत.
महायुतीच्या 2019 च्या तुलनेत 24 जागा कमी झाल्या आहेत. महायुतीला 2024 च्या लोकसभा निवडणुकीत 17 जागांवर विजय मिळाला. तर महाविकास आघाडीच्या 24 जागात वाढ झाली आहे. महाविकास आघाडीला 31 जागांवर विजय मिळाला. त्यामुळे महाविकास आघाडीमधील काँग्रेस, शिवसेना ठाकरे गटाकडून आशिष शेलार तुम्ही कधी संन्यास कधी घेणार आहात, असा प्रश्न विचारला जात आहे. आशिष शेलार हे महाविकास आघाडीवर विशेषत: शिवसेना ठाकरे गटाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका करत होते. त्यामुळे ठाकरे गटाचे नेते सोशल मीडियावर आशिष शेलार यांच्याविरोधात आक्रमक झाले आहेत.
- काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी एक्स मीडियावर पोस्ट करत म्हटले, " आशिष शेलारजी शब्दाचे पक्के आहेत. त्यामुळे त्यांनी राजकारण सोडल्यावर दुःख नक्कीच होईल. पुढील वाटचालीसाठी आगाऊ शुभेच्छा."
- अभिनेता किरण माने यांनीदेखील भाजपा नेता शेलार यांना राजकीय संन्यास घेण्याच्या वक्तव्याची आठवण करून दिली. त्यांनी म्हटले, "खरा मर्द दिलेला शब्द पाळतो. आशिषजी तुम्ही तो पाळणार याची खात्री आहे !"
- शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी शेलार यांच्या राजकीय संन्यासाची तयारी करून दिल्याचं सांगितलं. त्यांनी एक्स मीडियावरील पोस्टमध्ये म्हटले, "आशिष शेलारजी संन्यासाची तारीख कधी जाहीर करताय तेवढे सांगा ना... म्हणजे तुमच्या संन्यास सोहळ्याला मला तुम्हाला भगवी कफनी, रुद्राक्षाच्या माळा, काठी , लोटी , सगळं देता येईल.. !
- सामाजिक कार्यकर्त्या अंजनी दमानिया यांनी आशिष शेलार यांच्या विधानाचा व्हिडिओ पोस्ट करत राजकारण कधी सोडत आहात, असा प्रश्न विचारला आहे.