मुंबई/नवी दिल्ली : विधानसभा निवडणुकीच्या निकालात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. त्यामुळं राज्यात आता महायुतीतून कोण मुख्यमंत्री होणार? यावर जोरदार चर्चा सुरू आहेत. महायुतीच्या नेत्यांमध्ये बैठकांचं सत्र सुरू आहे. आपला नेता मुख्यमंत्री व्हावा, अशी सर्वच नेत्यांची, कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे. अशातच केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलेल्या एका विधानानं शिवसेनेचे नेते आक्रमक झाले आहेत.
रामदास आठवले नेमकं काय म्हणाले? : "देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्याचं भाजपाच्या नेतृत्वानं ठरवलं आहे. याआधी एकनाथ शिंदे यांना अडीच वर्षासाठी मुख्यमंत्रीपद दिलं होतं. त्यामुळं आता भाजपानं हे पद घ्यावं, अशी भाजपाच्या वरिष्ठांची इच्छा आहे. या निर्णयामुळं एकनाथ शिंदे हे नाराज असल्याची माहिती मिळत आहे. आम्ही त्यांची नाराजी दूर करणार आहोत. महायुतीच्या विजयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मोठा वाटा आहे. त्यांनी दिल्लीच्या राजकारणात येऊन म्हणजे राष्ट्रीय राजकारणात योगदान द्यावं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच होतील," असं वक्तव्य रामदास आठवले यांनी केलं. त्यांच्या या वक्तव्यावर शिवसेनेकडूनही जशाच तसे प्रत्युत्तर देण्यात आलं आहे.
#WATCH | Delhi: On CM face in Maharashtra, Union Minister & RPI-Athawale President, Ramdas Athawale says, " the maharashtra dispute should end soon...bjp's high command has decided that devendra fadnavis should be made the cm but eknath shinde is unhappy and his displeasure needs… pic.twitter.com/vB6J2FYZ5u
— ANI (@ANI) November 26, 2024
यांचा यात काहीच रोल नाही : रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री हा भाजपाचाच होणार आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार असं वक्तव्य केल्यानंतर यावर शिवसेना पक्षातून प्रतिक्रिया उमटत आहेत. "रामदास आठवले नेमकं काय बोलले, मला माहिती नाही. मात्र, मुख्यमंत्रिपदाबाबत अजून कोणाचेही नाव निश्चित झालेलं नाही. मुख्यमंत्रिपदाबाबतचा सर्वस्वी निर्णय तिन्ही पक्षाचे प्रमुख बसून एकत्र घेतील," अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे आमदार संजय शिरसाठ यांनी दिली. "मुख्यमंत्रिपदाबाबतच्या प्रक्रियेत रामदास आठवले यांचा रोल काहीच नाही. जर त्यांचा रोल काहीच नाही, तर ते अशी वक्तव्य का करत आहेत? मला माहिती नाही," असा टोलाही संजय शिरसाट यांनी रामदास आठवलेंना लगावला.
चर्चा करून तोडगा निघेल : "मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असेल? याबाबत आमचे तीन नेते एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे एकत्र बसून यावर चर्चा करतील. काहीही असो, त्यांनी जो निर्णय घेतला तो महायुतीच्या सर्व आमदारांना मान्य होईल आणि तोच निर्णय अमलात येईल. आपल्याच पक्षाच्या नेत्याला मुख्यमंत्रिपद मिळावं, असे प्रत्येक पक्षाला वाटतं. तुम्ही मला विचाराल तर एक शिवसैनिक म्हणून मी म्हणेन की, आमचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपद मिळावं. पण तिन्ही नेते एकत्र बसतील व चर्चा करून तोडगा निघेल," अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते शंभूराज देसाई यांनी दिली.
आदर पण... सल्ल्याची गरज नाही : रामदास आठवले यांनी मुख्यमंत्रिपदाबाबतच्या केलेल्या वक्तव्यावर आमदार उदय सामंत यांनीही प्रतिक्रिया दिली. "रामदास आठवले मोठे नेते आहेत, केंद्रीय मंत्री आहेत. त्यांच्याविषयी आमच्या मनात नक्कीच आदर आहे. मात्र, त्यांच्या सल्ल्याची आम्हाला गरज नाही," असं म्हणत उदय सामंत यांनी रामदास आठवले यांच्यावर पलटवार केला. "आम्ही आमच्या पक्षाचं बघून घेऊ आणि मुख्यमंत्रिपदाबाबत तिन्ही पक्षाचे मुख्य नेते बसून यावर निर्णय घेतील. मात्र, रामदास आठवलेंनी आम्हाला सल्ला देऊ नये," असंही उदय सामंत म्हणाले.
चांगले दिवस येतील : "मुख्यमंत्रिपदाबाबतचा निर्णय तिन्ही पक्षाचे ज्येष्ठ नेते दिल्लीत बसून केंद्रीय पातळीवर घेतील. परंतु, महाराष्ट्रात जे गतवैभव होते, ते पुन्हा महाराष्ट्राला प्राप्त करून देण्याचा महायुती सरकार नक्कीच प्रयत्न करेल. महाराष्ट्राला आता चांगले दिवस येतील," असा विश्वास माजी मंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केला.
'एक'नाथ है तो सेफ है : विधानसभा निवडणुकीत 'बटेंगे तो कटेंगे' आणि 'एक है तो सेफ है' हा नारा महायुतीनं प्रचारात दिला होता. यानंतर निकाल महायुतीच्या बाजूनं लागला. 'एक है तो सेफ है' आणि 'बटेंगे तो कटेंगे' या दोन्ही घोषणा धर्माच्या आधारावर प्रचारात केल्याचं बोललं जातं. 'एक है तो सेफ है' या नाऱ्यानंतर आता मुख्यमंत्रिपदावर एकनाथ शिंदेंनी विराजमान व्हावेत, अशी भूमिका शिवसेना पक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांची आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होण्यासाठी कार्यकर्ते आग्रही आहेत. "'एक है तो सेफ है' या नाऱ्यानंतर आता 'एक'नाथ है तो सेफ है," असा नारा आमदार मनिषा कायंदे यांनी दिला.
.
हेही वाचा
- "हे बघा आणि तुम्हीच ठरवा, EVM ची कमाल"; जितेंद्र आव्हाडांनी 'त्या' 12 आमदारांची लिस्ट केली शेयर
- अहिल्यानगर जिल्ह्यात मंत्रिपदाची माळ कोणाच्या गळ्यात? विखे पाटील यांच्यासह राजळे, जगताप, लंघे, खताळ, काळे मंत्रिपदाच्या रेसमध्ये
- 2014 नंतर भारतात बॉम्बस्फोट घडवण्याची कुणाची हिंमत नाही, देवेंद्र फडणवीसांनी ठणकावून सांगितलं