सातारा - काँग्रेस आणि शरद पवारांचा बालेकिल्ला फोडत भाजपा, शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीने सातारा जिल्ह्यावर महायुतीचा झेंडा रोवला. साताऱ्यातून शिवेंद्रराजे भोसले यांनी उच्चांकी मतांनी विजय मिळवत सलग पाचव्यांदा विधीमंडळात प्रवेश केला, तर वाईतून मकरंद पाटलांनी विजयी चौकार मारला. मंत्रिमंडळात दोघांचाही समावेश निश्चित असून शिवेंद्रराजेंच्या रूपाने जिल्ह्याचे पालकमंत्रिपद राजघराण्यात जाण्याची शक्यता आहे.
साताऱ्याला दोनच मंत्रिपदे मिळण्याची शक्यता : राज्यात महायुतीनं प्रचंड मोठं बहुमत मिळवलंय. त्यामुळं महायुतीतील तिन्ही पक्षांमध्ये मंत्रिपदासाठी इच्छुकांची संख्या मोठी आहे. महाविकास आघाडी सरकारच्या पहिल्या अडीच वर्षात आणि त्यानंतर महायुतीच्या अडीच वर्षाच्या कार्यकाळात मंत्रिपदं मिळालेल्या सर्वांनाच पुन्हा मंत्रिपद मिळण्याची शक्यता नाही. त्या अर्थाने सातारा जिल्ह्यातही आता केवळ दोनच मंत्रिपदे मिळणार असल्याची चर्चा आहे.
एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपद स्वीकारण्यास तयार? : सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या भाजपाकडे राज्याचं मुख्यमंत्रिपद जाण्याची शक्यता आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यात जमा आहे. अशा स्थितीत मागील अडीच वर्षे मुख्यमंत्री राहिलेले एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपद घेणार नाहीत, असं बोललं जात होतं. परंतु, उपमुख्यमंत्री व्हायला ते तयार असल्याची चर्चा राजधानी मुंबईत सुरू झाली आहे.
शंभूराज देसाई, जयकुमार गोरेंना मंत्रिपदाची अपेक्षा : सध्या हाती येत असलेल्या माहितीनुसार, सातारा आणि वाई वगळता सातारा जिल्ह्यातील अन्य सहा मतदारसंघांना मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता धूसर आहे. त्यामागे काही कारण आहेत. तसेच उमेदवारी मिळाल्यानंतर निवडून आलो, हेही नसे थोडके, अशी देखील कराड दक्षिण, कराड उत्तरमधील उमेदवारांची भावना आहे. मंत्रिमंडळात पक्षीय समतोल साधताना अनेकांना मंत्रिपदापासून वंचित राहावे लागणार आहे. मात्र, आपल्याला मंत्रिपद मिळेल, अशी शंभूराज देसाई आणि जयकुमार गोरे यांना अपेक्षा आहे.
हेही वाचा -