मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकीचे निकाल धक्कादायक असून यामध्ये ईव्हीएमची यामध्ये मोठी भूमिका असल्याचं मत राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या पराभूत उमेदवारांनी शरद पवार यांच्यासमोर व्यक्त केलं. पराभूत आमदारांची आज मुंबईत बैठक झाली, या बैठकीत त्यांनी आपलं मत मांडलं. ईव्हीएम विरोधात अनेक उमेदवारांनी तक्रार केल्यानं त्याबाबत कायदेशीर लढा देण्यासाठी वकिलांची समिती नेमण्यात येणार असल्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
पराभवाची कारणं समजून घेण्यासाठी बैठक : या बैठकीला विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या अधिकृत तिकीटावर लढून पराभूत झालेले उमेदवार उपस्थित होते. यावेळी शरद पवार यांनी उमेदवारांना या पराभवानं नाराज होऊन मागे हटायचं नाही, पूर्ण ताकदीनं लढायचा संदेश दिल्याचं सांगण्यात आलं. निवडणूक प्रक्रियेत ज्या चुकीच्या बाबी घडल्या ते सर्व पुरावे गोळा करण्याच्या सूचना देखील उमेदवारांना या बैठकीत देण्यात आल्या. व्हीव्हीपीएटी तपासणीसाठी गुरुवारपर्यंतची वेळ असल्यानं तपासणी करुन घेण्याचे निर्देश शरद पवारांनी उमेदवारांना दिले.
फक्त 10 उमेदवार विजयी : राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाण येथं बैठक झाली. त्यामध्ये राज्यभरातील पक्षाच्या उमेदवारांनी आपापली भूमिका मांडली. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड, रोहित पवार, माजी मंत्री अनिल देशमुख, खासदार अमर काळे, खासदार अमोल कोल्हे तसेच बारामतीमधून लढलेले युगेंद्र पवार, शशिकांत शिंदे, राजेंद्र शिंगणे, हर्षवर्धन पाटील, प्रशांत जगताप, राणी लंके, राजे देशमुख, मयुरा काळे, सुधाकर भालेराव, सलील देशमुख, बाळासाहेब पाटील, सुनील भुसारा, मेहबूब शेख , रोहिणी खडसे, फहाद अहमद उपस्थित होते. विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसला (शरदचंद्र पवार) मोठा फटका बसला असून पक्षाचे फक्त 10 उमेदवार विजयी झाले आहेत.
आंदोलन करण्याची गरज : "ईव्हीएमबाबत जनतेच्या, कार्यकर्त्यांच्या मनात जी शंका आहे ती दूर करण्याची गरज आहे. ईव्हीएम बाबतच्या शंका तपासायला चार दिवस द्या. आमचे तज्ञ ईव्हीएम तपासतील, चिकित्सा करतील व आपला संशय दूर करतील," असं रोहित पवार म्हणाले. सर्व विरोधी पक्षांना एकत्र येऊन आंदोलन करण्याची गरज रोहित पवारांंनी यावेळी व्यक्त केली. "2019 च्या लोकसभेच्या तुलनेत तब्बल 98 लाख व लोकसभेच्या निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीपर्यंत मतदारांमध्ये 74 ते 82 लाख एवढी मोठी वाढ झाली," ही वाढ संशयास्पद असल्याचा आरोपही रोहित पवार यांनी केला.
लोकांना मूर्ख बनवण्यासाठी ईव्हीएमचा वापर : "ईव्हीएममध्ये प्रत्येक जिल्ह्याला मतांचा पॅटर्न दिल्याचा संशय जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केला. "आपण पहिल्या दिवसापासून ईव्हीएम विरोधात आहोत, लोकशाही धोक्यात आली आहे. त्यामुळं संविधानानं स्थापन केलेल्या निवडणूक आयोगानं याबाबत सर्व बाबी स्पष्ट करुन याबाबतचा संशय दूर करण्याची आहे. छोट्या राज्यांच्या निवडणुकीत विरोधकांना संधी देऊन मोठी निवडणूक आपल्याकडे घ्यायची, असा पॅटर्न राबवला जात आहे. लोकांना मूर्ख बनवण्यासाठी ईव्हीएमचा वापर केला जातोय. अमेरिकेसारख्या प्रगत देशातही अजूनही मतपत्रिकेवर मतदान केलं जातं. भारताचा रशिया होऊ देऊ नका," असं आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले.
ईव्हीएमचा जनादेश : ईव्हीएममध्ये 15 टक्के मतं महायुतीसाठी सेट केल्याचा आरोप प्रशांत जगताप यांनी केला. तर खासदार अमर काळे यांनी भविष्यात ईव्हीएमवर निवडणूक झाली तर लोकशाही संपुष्टात येईल, असा दावा केला. "ईव्हीएम हटवण्यासाठी लढा तीव्र करण्याची गरज आहे. राज्यात सरकारविरोधात प्रचंड असंतोष असताना अशी लाट येणं अशक्य आहे. लोकसभेनंतर लगेच एवढा बदल शक्य नाही, हा जनादेश नाही तर ईव्हीएमचा जनादेश आहे," असं अमर काळे म्हणाले.
विरोधी उमेदवारांना पिपाणी चिन्ह कसं? : सलील देशमुख यांनी अशा प्रकारचा जनमत कौल मिळणं मान्य नसल्याची भूमिका मांडली. "ईव्हीएमबाबत साशंकता असताना विरोध असताना ईव्हीएमचा अट्टाहास का? ईव्हीएमचं व निवडणूक आयोगाचं वकीलपत्र भाजपानं घेतलंय. तुतारी चिन्ह असलेल्या मतदारसंघात विरोधी उमेदवारांना नेमकं पिपाणी चिन्ह कसं मिळतं?," असा सवाल सलील देशमुख यांनी उपस्थित केला.
हेही वाचा