छत्रपती संभाजीनगर Lok Sabha Election 2024: अमरावतीमध्ये आनंदराज आंबेडकर (Anandraj Ambedkar) यांना पाठिंबा देत असल्याची घोषणा एमआयएम पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी वैजापूर येथे झालेल्या जाहीर सभेत केली. भाजपाला हरवण्यासाठी आम्ही आनंदराज आंबेडकर यांच्यासोबत आहोत, तेथील मतदारांनी त्यांना मतदान करावं असं आवाहन त्यांनी यावेळी केलंय. तर दुसरीकडं जाहीर सभेत भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्याविरोधात जोरदार टीका करत असताना, वंचित आघाडीच्या विरोधात मात्र, एकही शब्द त्यांनी काढला नाही. त्यामुळं आगामी काळात वेगळं समीकरण तर जुळणार नाही ना? असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालाय.
इलेक्ट्रॉल बॉण्ड माध्यमातून भाजपाला मिळाले पैसे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणात आता मासबंदीचा उच्चार सुरू झाला आहे. उपवासाच्या काळात मास खाऊ नका असं ते म्हणतात, तर मी 30 दिवस रोजा पकडतो त्या काळात तुम्हीही जेवण करू नका, असं मी म्हणलं तर चालेल का? असा प्रश्न ओवैसी यांनी उपस्थित केलाय. इलेक्ट्रॉल बॉण्ड माध्यमातून सहा हजार कोटी रुपये भाजपाला मिळाले. तर इतर पक्ष देखील कुठे मागे नाहीत. मात्र मांस विकणाऱ्या कंपन्यांनी दिलेले पैसे इलेक्ट्रॉल बाँडच्या माध्यमातून कसे चालतात? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय. एकीकडं मास विकणाऱ्या कंपन्यांकडून पैसे घ्यायचं आणि दुसरीकडं मास विक्रीचे दुकानं बंद ठेवायचं असं सांगत गरीबाच्या पोटावर पाय मारायचं काम मोदी करतात. तर सर्व पक्षांना इलेक्ट्रॉल बॉण्डच्या माध्यमातून पैसे मिळाले. मात्र, आम्हाला या बॉण्डची गरज नाही, आम्ही तर जेम्स बॉण्ड आहोत अशी मिश्किल टीका त्यांनी राजकीय पक्षांवर केलीय. आमचा जनतेसोबतचा बॉण्ड खूप चांगला आहे. त्यामुळं आम्हाला पुन्हा यश मिळेल असा विश्वास देखील ओवैसी यांनी व्यक्त केला.