नागपूर : नागपुरात पोलिसांनी भन्नाट फिल्मी स्टाईलमध्ये एका गुंडाला पकडले आहे. शहरातील एका थिएटरमध्ये 'पुष्पा 2' फिल्म दाखवण्यात येत होती. याच थिएटरमध्ये एक ड्रग्स तस्करही चित्रपट पाहण्यात मग्न होता. माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यानच अमली पदार्थ तस्कराला अटक केली. विशाल मेश्राम असं अंमली पदार्थ तस्कराचं नाव आहे. पोलिसांनी त्याला गुरुवारी (19 डिसेंबर) रात्री थिएटरमधून पकडलं, जेथे तो चित्रपटाचा आनंद घेत होता. पोलिसांनी थिएटरमध्ये उपस्थित प्रेक्षकांना आश्वासन दिलं की, त्यांनी आरोपीला पकड आहे तुम्ही चित्रपटाचा आनंद घ्या.
10 महिन्यांपासून फरार होता : पाचपावली पोलीस स्टेशनच्या एका अधिकाऱ्यानं रविवारी (२२ डिसेंबर २०२४) सांगितलं की, "विशाल मेश्राम 10 महिन्यांपासून फरार होता आणि नुकताच प्रदर्शित झालेल्या 'पुष्पा 2' चित्रपट पाहण्यासाठी तो येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावेळी पोलिसांनी त्याला थिएटरमध्ये पकडलं. या गुंडाच्या विरोधात 27 गुन्हे दाखल आहेत. त्यानं यापूर्वीही पोलिसांवर हल्ला केला होता.
नाशिक कारागृहात हलवण्यात येणार : पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं, “आम्ही सतत त्याचा पाठलाग करत होतो. त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवत होतो. गुरुवारी (19 डिसेंबर) त्याला शोधून काढल्यानंतर पोलिसांनी त्याला पळून जाण्यापासून रोखण्यासाठी शहराच्या मध्यभागी असलेल्या सिनेमा थिएटर बाहेर त्याच्या गाडीचे टायर फोडले. चित्रपटाच्या क्लायमॅक्सच्या वेळी जेव्हा पोलीस थिएटरमध्ये गेले तेव्हा मेश्राम चित्रपट बघण्यात दंग होता. पोलिसांनी त्याला घेरलं आणि अटक केली, त्याला पळ काढण्याची संधी दिली नाही. मेश्राम सध्या नागपूर मध्यवर्ती कारागृहात असून लवकरच त्याला नाशिक कारागृहात हलवण्यात येणार असल्याची माहिती पाचपावली पोलिसांनी दिली.
हेही वाचा -
- अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या 16 अफ्रिकन तस्करांना ठोकल्या बेड्या; 12 कोटींचे अमली पदार्थ जप्त
- सीमा शुल्क विभागाचा तस्करांना दणका; तब्बल १९ कोटीचे अमली पदार्थ नष्ट - NAGPUR CRIME
- ड्रग्ज मुक्त महाराष्ट्र करण्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निर्धार, आपण बुलडोझर बाबा नसल्याचं केलं स्पष्ट - Drug free Maharashtra