मुंबई : अभिनेता सैफ अली खान हल्ल्याप्रकरणी दररोज नवीन ट्विस्ट येत आहेत. मुंबई पोलिसांनी चुकीच्या व्यक्तीला याप्रकरणी ताब्यात घेतलं होतं. पोलिसांच्या या चुकीमुळे आकाश कनौजियाचे आयुष्य उद्ध्वस्त झालं असल्याचं आता उघड झालं आहे. कारण त्याची नोकरी आणि लग्नही मोडलं आहे. सैफ अली खानवरील हल्ल्याप्रकरणी चुकूच्या व्यक्ती ताब्यात घेण्यात आल्यानंतर अनेकांच्या आयुष्यावर वाईट परिणाम झाला आहे. दरम्यान पोलिसांनी आकाश कैलाश कनौजियाला संशयित म्हणून ताब्यात घेतलं होतं. यानंतर खऱ्या आरोपीला ठाण्यातून अटक करण्यात आली होती. आकाश मुंबईहून जाजांगीरला जात असताना त्याला दुर्ग स्टेशनवर संशयित असल्याचं रेल्वे पोलिसांनी अटक केली होती.
आकाशचं मुंबई पोलिसांमुळे आयुष्य झालं उद्ध्वस्त : आकाशला मुंबई पोलिसांच्या चुकीचे परिणाम भोगावे लागत आहेत. त्याला त्याच्या खाजगी कंपनीनं नोकरीवरून काढून टाकलं आहे. तसेच त्याचं लग्न देखील तुटलं आहे. ही घटना मुंबई पोलिसांनी आरपीएफला पाठवलेल्या चुकीच्या अलर्टमुळे घडली आहे. आकाश हा सैफ अली खानचा हल्लेखोर असल्याचं यापूर्वी सांगण्यात आलं होतं. यानंतर पोलिसांनी आरोपी शरीफुल इस्लाम शहजादला ठाण्यातून अटक केली. शहजादला अटक झाल्यानंतर आकाशची सुटका करण्यात आली. तसेच मुंबई पोलिसांना आकाशनं विनंती केली होती, की त्याला सीसीटीव्ही फुटेज तपासण्याची आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांशी बोलण्याची परवानगी देण्यात यावी, मात्र त्याचं काहीही ऐकण्यात आलं नाही.
आकाशची लढाई : दरम्यान अटक करणाऱ्या व्यक्तीचा चेहरा हा सीसीटीव्हीमध्ये दिसणाऱ्याशी जुळत नाही, अशी देखील चर्चा आधी सोशल मीडियावर सुरू होत्या. आता आकाश इंटरनेटवरून त्याचे खोटे ओळखपत्र असलेले फोटो काढून टाकण्याची कायदेशीर लढाई लढत आहे. दरम्यान 16 जानेवारी रोजी सैफ अली खानवर त्याच्या मुंबईतील राहत्या घरी एका चोरानं चाकूनं सहा वेळा वार केले होते. यानंतर त्याला रुग्णालयात नेण्यात आलं होतं. तसेच या घटनेनंतर सैफच्या घरातील आरोपीचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले होते, यात एक व्यक्ती पायऱ्या उतरताना दिसत होता. यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणाऱ्या आकाश कनौजिया नावाच्या व्यक्तीला ताब्यात घेतलं होतं.
फिंगरप्रिंट नमुन्याचा निगेटिव्ह रिपोर्ट : यानंतर पोलिसांनी ठाण्यातून खऱ्या आरोपीला अटक केली. याची ओळख बांग्लादेशी असल्याची सांगण्यात आली होती. या आरोपीचं नाव शरीफुल इस्लाम शहजाद आहे. त्यानं आपला आरोप कबुल केला आहे. या आरोपीनं भारतात आल्यानंतर आपलं नाव विजय दास असं ठेवलं होतं. दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार गुन्ह्याच्या ठिकाणी सापडलेले बोटांचे ठसे शरीफुलच्या, बोटांच्या ठशांशी जुळत नाहीत. सीआयडीनं मुंबई पोलिसांना फिंगरप्रिंट नमुन्याचा निगेटिव्ह रिपोर्ट दिला आहे. शुक्रवारी न्यायालयानं शहजादची पोलिस कोठडी 29 जानेवारीपर्यंत वाढवली आहे.
हेही वाचा :