शिर्डी - नातवंडांना कुठल्याही क्षेत्रात यश मिळालं की आजीला खूप आनंद होतो. आजी म्हणजे जीवापाड नातवाला जपणारी त्याची मोठी आईच असते. याचाच प्रत्यय अहिल्यानगर जिल्ह्यातील एकनाथवाडी येथील जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता सहावीतील साई आंबेकर या विद्यार्थ्याच्या जिल्हास्तरीय हस्ताक्षर स्पर्धेतील यशामुळे आलाय.
हस्ताक्षर स्पर्धेत यश - पाथर्डी तालुक्यातील एकनाथवाडी येथील जिल्हा परिषद शाळेतील सहावीत शिकणाऱ्या साई आंबेकर या विद्यार्थ्यानं जिल्हास्तरीय हस्ताक्षर स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावला आहे. साईला आजी आसराबाई यांचं पाठबळ आणि मार्गदर्शनामुळे हे यश मिळालय. साईचे आई-वडील ऊसतोड मजूर असल्यानं ते सध्या श्रीगोंदे तालुक्यात गेले आहेत. त्यामुळं साई त्याचा भाऊ आणि दोन चुलत भावंडांची जबाबदारी ही साईच्या आजी-आजोबांवर आहे.
नातवंडांनी शिकावे - नातवंडांनी शिकून मोठं व्हावं हीच आजी-आजोबांची इच्छा आहे. जिल्हास्तरीय हस्ताक्षर स्पर्धेसाठी मेहनत घ्यावी लागेल. याची जाणीव आजीला होती. त्यामुळे आजी आसराबाई या साईच्या सरावाकडे लक्ष ठेवून होत्या. रात्री साईला झोप लागू नये म्हणून त्याच्या शेजारी बसून त्या साईचा सराव करुन घेत होत्या. पहाटे लवकर साईला उठवून त्या आपल्या कामाला सुरुवात करायच्या. या स्पर्धेत नातू साई याने तृतीय क्रमांक पटकावल्याचं समजल्यानंतर डोळ्यांतून पाझरणारे आनंदाश्रू हे आजीच्या अबोल भावनांना वाट मोकळी करुन देत होते.
यशाचा आजीला आनंद - जिल्हास्तरीय हस्ताक्षर स्पर्धेच्या दिवशी साई माझ्या पाया पडला. तेव्हा तो म्हणला बाई मी यशस्वी होईल ना? त्यावेळी त्याच्याही आणि माझ्याही डोळ्यात पाणी आलं. सुरुवातीला त्याने सरावाचा कंटाळा केला. मात्र नंतर त्यानं रात्री आणि पहाटे लवकर उठून नियमित लेखनाचा सराव केला. तो जिल्ह्यात तिसरा आल्यानंतर खूप आनंद झाला असल्याचं आजी आसराबाई आंबेकर यांनी सांगितलं.
शिक्षकांचे प्रयत्न - आई-वडील ऊस तोड मजूर आणि दिवसभर कष्ट करून थकलेली आजी रात्री आपल्या शेजारी बसते याची जाणीव साईला होती. त्यासाठी त्याने प्रामाणिक प्रयत्न केले. स्पर्धेच्या दिवशी मला आजीसाठी ही स्पर्धा जिंकायची आहे, असं साईनं वर्ग शिक्षक संदीप राठोड यांना सांगितलं. साईची घरची परिस्थिती हलाकीची आणि आजीची नातवाला शिकण्यासाठी सुरू असलेली धडपड पाहता वर्ग शिक्षक संदीप राठोड आणि एकनाथ आधळे, बाबासाहेब जाभाई, सीमा पालवे, अशोक पालवे, संतोष गव्हाणे, गणेश कांबळे शाळेचे मुख्याध्यापक भाऊसाहेब सुपेकर यांनी साईला प्रोत्साहन दिलं. ग्रामीण भागातील एका ऊस तोड मजुराच्या मुलानं मोत्याहूनही सुंदर हस्ताक्षर काढल्यानं त्याचा जिल्ह्यात तृतीय क्रमांक आल्यानं सर्वच थरातून साईचं कौतुक होतय.
हेही वाचा..