मुंबई - महायुतीसह महाविकास आघाडीनं उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून उमेदवारांची घोषणा उशिरा केली. महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांचे नाव घोषित झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी महायुतीकडून भाजपानं विधीज्ञ उज्ज्वल निकम यांचे नाव जाहीर करण्यात आले. अशा परिस्थितीमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी एमआयएमकडून रमजान चौधरी यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आले आहे.
शेवटच्या क्षणी एमआयएमचा उमेदवार रिंगणात-भाजपानं उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात येथील विद्यमान खासदार आणि दोन वेळच्या विजयी उमेदवार पुनम महाजन यांचा पत्ता कट करून विधीज्ञ उज्वल निकम यांना उमेदवारी दिली आहे. तर महाविकास आघाडीत ही जागा काँग्रेसच्या वाट्याला आल्यानं काँग्रेसकडून मुंबई काँग्रेस अध्यक्ष, आमदार वर्षा गायकवाड यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. हा मतदारसंघ बहुभाषिक असल्याकारणाने सर्व समाजाच्या मतदारांची संख्या येथे आहे. या भागात मुस्लिम बांधवांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे. येथून उमेदवारी मिळावी, यासाठी काँग्रेसचे नेते नसीम खान यांनी शर्थीचे प्रयत्न केले होते. परंतु त्यांना उमेदवारी नाकारल्यानं ते अद्याप नाराज आहेत. अशा परिस्थितीमध्ये आता उज्ज्वल निकम आणि वर्षा गायकवाड यांच्याविरुद्ध एमआयएमकडून रमजान चौधरी यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळेही निवडणूक आता तिरंगी होणार आहे.
यंदा पूनम महाजन यांचा पत्ता कट-उत्तर मध्य मुंबई लोकसभा संघात विधानसभेचे सहा मतदार संघ येतात. यामध्ये विलेपार्ले येथे पराग अळवणी, तर वांद्रे पश्चिम येथे आशिष शेलार हे भाजपाचे दोन आमदार आहेत. चांदीवली येथे दिलीप लांडे आणि कुर्ला येथे मंगेश कुडाळकर हे शिवसेना शिंदे गटाचे दोन आमदार आहेत. कलिना मतदारसंघात उद्धव ठाकरे गटाचे संजय पोतनीस हे आमदार आहेत. तर वांद्रे पूर्व येथे काँग्रेसचे झिशान सिद्दिकी हे आमदार आहेत. २०१४ व २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या पुनम महाजन यांनी सलग दोनदा काँग्रेसच्या प्रिया दत्त यांचा पराभव केला होता. २०१४ च्या तुलनेत २०१९ मध्ये पुनम महाजन यांना अधिक मतं भेटली असली तरी त्यांच्या मतांची टक्केवारी कमी झाली होती. २०१९ च्या निवडणुकीत पुनम महाजन यांना ४,८६,६७२ मते मिळाली होती. तर प्रिया दत्त यांना ३,५६,६६७ मते मिळाली होती.