मुंबई- दिल्ली निवडणुकीचे निकाल शनिवारी जाहीर झालेत. दिल्लीत आम आदमी पक्षाला त्यांची मागील 10 वर्षांची सत्ता गमवावी लागलीय. पक्षाचे सर्वेसर्वा अध्यक्ष अरविंद केजरीवाल, नेते मनीष सिसोदिया आणि सौरभ भारद्वाज यांच्यासारख्या दिग्गजांनाही आपली जागा वाचवता आलेली नाही. नवी दिल्ली मतदारसंघातून केजरीवाल यांची ही चौथी निवडणूक होती आणि येथे त्यांचा पहिल्यांदाच पराभव झालाय. या निकालावर आता विरोधी पक्षाकडून प्रश्न उपस्थित केले जात असून, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी भाजपाचे अभिनंदन केलंय. यावर आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली असून, अण्णा हजारे यांच्यावर देखील भाष्य केलंय.
विजयासाठी साम-दाम-दंड-भेद वापरलं : दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालावर बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले की, राजकारणात संसदीय लोकशाहीत जय-पराजय, हार-जीत होत असतात. मात्र, मागच्या दहा वर्षांत भाजपा सत्तेत आल्यापासून त्या संविधानिक पद्धतीत निवडणूक होत नाहीत. विजयासाठी साम-दाम-दंड-भेद वापरलं जातंय. मतदार यादीतील घोळ महाराष्ट्रप्रमाणे इतरही राज्यात आहेत. काँग्रेस आणि आम आदमी पक्ष एकत्र लढले असते तर निकाल वेगळा लागला असता. आपण यातून शिकायला हवं, असंही संजय राऊतांनी अधोरेखित केलंय.
केजरीवालांचा पराभव झाला याचा अण्णांना आनंद : पुढे बोलताना खासदार राऊत म्हणाले की, अण्णा हजारे काय बोलतात त्याला अर्थ नाही. मोदींच्या कार्यकाळात भ्रष्टाचार झाला, त्यावेळी अण्णा कुठे होते? मोदी सत्तेत आल्यावर झालेल्या भ्रष्टाचारावर अण्णा हजारे बोलत नाहीत. केजरीवाल यांचा पराभव झाला याचा आनंद अण्णांना झाला. देश लुटला जातोय. एकाच उद्योगपतीच्या घशात सर्व घातलं जातंय. याने लोकशाही टिकेल का? असा प्रश्न खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केलाय.
ते कशासाठी लढत होते? : या निकालानंतर भाजपा नेत्यांनी देखील इंडिया आघाडी आणि आम आदमी पक्षावर टीका केलीय. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, आम्ही खुर्चीसाठी लढत होतो तर, ते कशासाठी लढत होते? महाराष्ट्रातलं सरकार ही येड्यांची जत्रा आहे. मुख्यमंत्रिपदाची खुर्ची गेल्यावर फडणवीस यांचा तो चेहरा पाहिलाय. तर आता ज्यांची खुर्ची गेली आहे ते कसे रुसून बसत आहेत तेही पाहतोय. अमित शाहांनी शब्द पाळला असता तर ती घडामोड झाली नसती. 2019 ला आम्ही चर्चा केली, असं ते म्हणत आहेत. मग 2014 ला काय झालं होतं? का भाजपाने तेव्हा युती तोडली? शिवसेना प्रमुख नाहीत या आनंदात भाजपाने निवडणुका लढवल्या. देवेंद्र फडणवीस यांना विजयाचं हँग ओव्हर झालंय, किंवा ते सारखा विजय पाहून डिपरेस झालेत. शिंदेंचं ऑपरेशन कधी अमित शाहा करतील हे त्यांना ही कळणार नाही, असा टोलाही राऊतांनी लगावलाय.
हेही वाचाः
"...तर संजय राऊत यांनी पत्रकार परिषद न घेता साधना करावी", चंद्रकांत पाटील यांचा राऊतांना टोला
महाराष्ट्रात लोकसंख्येपेक्षा मतदार अधिक, राहुल गांधींकडून निवडणूक आयोगाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह