मुंबई Manoj Jarange VS Devendra Fadnavis : राज्य सरकारनं विशेष अधिवेशन बोलावून मराठा समाजाला 10 टक्के स्वतंत्र आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. मात्र, यावरुन मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील नाराज असल्याचं पहायला मिळतंय. याच पार्श्वभूमीवर आज (25 फेब्रुवारी) बोलत असताना मनोज जरांगे पाटलांनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला. तसंच त्यांना खुलं आव्हान देत जरांगे म्हणाले की, "देवेंद्र फडणवीस तुम्हाला मला मारायचंच असेल, तर मी स्वतः सागर बंगल्यावर येतो, मला मारून दाखवा”, असं ते म्हणाले. यानंतर सर्वत्र एकच खळबळ उडाल्याचं बघायला मिळतंय. याच पार्श्वभूमीवर आता फडणवीसांच्या सागर बंगल्या भोवतीच्या सुरक्षा यंत्रणेत वाढ करण्यात आली आहे.
डीसीपी मोहित गर्ग यांनी केली पाहणी :मनोज जरांगे पाटलांनी देवेंद्र फडणवीसांना केलेल्या आव्हानानंतर हा वाद अजूनच पेटून उठणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्या भोवती कडेकोट पोलीस बंदोबस्त करण्यात आलाय. तसंच डीसीपी मोहित गर्ग यांनी स्वतः या ठिकाणची पाहणी केली आहे. मात्र, असं असलं, तरीही या प्रकरणावरुन आता पुन्हा एकदा मराठा आंदोलक मुंबईकडं येण्याची शक्यता आहे.