हैदराबाद : पोंगल (Pongal) या सणाला दक्षिण भारतात विशेष असं महत्त्व आहे. यंदा हा सण 14 जानेवारी म्हणजेच मकर संक्रांतीपासून (Makar Sankaranti) सुरू होणार आहे. 4 दिवस चालणारा हा सण 17 जानेवारीला संपणार आहे. दक्षिण भारतातील लोक नवीन वर्ष म्हणून 'पोंगल' सण साजरा करतात. मान्यतेनुसार, या दिवशी लोक घरातील जुने सामान, वस्तू काढून टाकतात आणि नवीन वस्तूची खरेदी केली जाते. पोंगल सण समृद्धीसाठी समर्पित असल्याचं म्हटलं जातं. यादिवशी धान्य गोळा केलं जातं आणि येणारं पीक चांगलं येवो अशी देवाकडं प्रार्थना करून सण साजरा केला जातो.
पोंगल 2025 तारीख : यावर्षी पोंगल 14 जानेवारी 2025 रोजी आहे. तामिळनाडूमध्ये नवीन वर्षाची सुरुवात पोंगल सणाने होते. हा सण चार दिवस साजरा केला जातो. पोंगलचा शेवटचा दिवस म्हणजे 'मट्टू पोंगल'. या दिवशी बैल, गाय, वासरू यांची पूजा केली जाते. तमिळमध्ये 'मट्टू' या शब्दाचा अर्थ बैल असा होतो. या दिवशी बैलांना सजवून मोत्यांच्या घंटा बांधल्या जातात. तसंच त्यांच्या शिंगांना तेल लावलं जातं. या दिवशी बैलांच्या शर्यतीही होतात, ज्याला जल्लीकट्टू म्हणतात.
पोंगल म्हणजे काय? : असं मानलं जातं की पोंगल सणाच्या आधी अमावस्या येते तेव्हा प्रत्येकजण वाईटाचा त्याग करून चांगले अंगीकारण्याचे व्रत घेतो, ज्याला ‘पोही’ असंही म्हणतात. पोही म्हणजे ‘जाणे’, याशिवाय तमिळ भाषेत पोंगल म्हणजे उफान असा होतो.
पोंगल कसा साजरा केला जातो? : पोंगल हा मुख्यतः सूर्याच्या उपासनेचा सण आहे. पोंगलच्या पहिल्या दिवशी लोक सकाळी नवीन कपडे घालतात. पोंगलचा प्रसाद हा नवीन भांड्यात दूध, तांदूळ, काजू आणि गूळ घालून बनवला जातो. त्यानंतर हा प्रसाद सूर्य देवाला अर्पण केला जातो. या दिवशी शेतकरी बैलांना आंघोळ घालतात आणि त्यांना सजवतात. या दिवशी घरातील जुन्या आणि खराब झालेल्या वस्तू जाळून नवीन वस्तू घरी आणतात.
(टीप: सदरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे, 'ईटीव्ही भारत' यातील माहितीच्या सत्यतेचा दावा करत नाही.)
हेही वाचा -