हैदराबाद 3 IPS Officer Suspension : मुंबईतील अभिनेत्रीला बेकायदेशीरपणे ताब्यात घेणे आणि धमकी दिल्याप्रकरणी तीन आयपीएस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. माजी गुप्तचर प्रमुख पीएसआर अंजनेयुलू, कांथी राणा टाटा आणि विशाल गुन्नी यांना सरकारनं निलंबित (IPS Officers Suspended) केलं आहे. सरकारने तीन आयपीएस अधिकाऱ्यांना निलंबित करताना GO क्रमांक 1590, 1591, 1592 जारी केला आहे. डीजीपीच्या अहवालाच्या आधारे तीन आयपीएस अधिकाऱ्यांवर ही कारवाई करण्यात आली. डीजीपींनी यापूर्वीच एसीपी हनुमंत राव आणि इब्राहिमपट्टणम सीआय सत्यनारायण यांना निलंबित केलय. याप्रकरणी आणखी काही पोलिसांवर निलंबनाची कारवाई होण्याची शक्यता आहे.
एसआयटीचं आयोजन : मुंबईतील चित्रपट अभिनेत्रीने दिलेल्या तक्रारीनुसार, विजयवाडा सीपी एसीपी श्रावंती रॉय यांच्या नेतृत्वाखाली एसआयटी नियुक्त करण्यात आली होती. मुंबईतील अभिनेत्री, तिचे पालक आणि इतरांची एसआयटीने चौकशी केली. त्यांच्याकडून जबाब नोंदवण्यात आला. त्यानंतर या प्रकरणाचा प्राथमिक अहवाल तयार करून तो डीजीपींना सादर करण्यात आला. डीजीपींनी हा अहवाल सरकारला सुपूर्द केला. अहवाल तपासल्यानंतर सरकारने आयपीएस अधिकाऱ्यांना निलंबित केलं.
अधिकाराचा केला गैरवापर :या प्रकरणी दिलेल्या आदेशात राज्य सरकारनं म्हटलं की, विजयवाडाचे माजी पोलीस आयुक्त कांथी राणा टाटा तपासावर देखरेख करणारे अधिकारी म्हणून अपयशी ठरले आहेत. या प्रकरणात माजी गुप्तचर प्रमुख अंजनेयुलु यांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर केल्याचं आढळून आलं आहे. याप्रकरणी 02 फेब्रुवारी 2024 रोजी एफआयआर नोंदवण्यात आला होता. त्यानंतर अभिनेत्रीला अटक करण्याचे आदेश देण्यात आले होते.