छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी (Jashodaben Narendra Modi) या शुक्रवारी (7 फेब्रुवारी) छत्रपती संभाजीनगरात (Chhatrapati Sambhajinagar) आल्या होत्या. यावेळी त्यांनी खुलताबाद येथील भद्रा मारोती आणि बारावे ज्योतिर्लिंग असलेल्या घृष्णेश्वर महादेवाचं दर्शन घेतलं.
जशोदाबेन मोदी यांनी मंदिरातील अतिथी नोंदवहीत 'हर हर महादेव' लिहून आम्हाला दर्शनाचं सौभाग्य मिळालं, असं नमूद केलं. यावेळी मंदिर विश्वस्तांनी त्यांचा सत्कार केला. जाताना यशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.
ज्योतिर्लिंगाचं घेतलं दर्शन : 12 ज्योतिर्लिंगांपैकी शेवटचे ज्योतिर्लिंग असलेले घृष्णेश्वर मंदिर सर्वात महत्त्वाचे मानले जाते. जोपर्यंत घृष्णेश्वर महादेवाचे दर्शन घेत नाही, तोपर्यंत पूर्ण परिक्रमा होत नाही, अशी अख्यायिका आहे. अशा महत्त्वाच्या महादेव मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी शुक्रवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. श्री घृष्णेश्वर मंदिर देवस्थानतर्फे सुनील जोशी, योगेश विटखेडेकर, चंद्रशेखर शेवाळे यांनी जशोदाबेन मोदी यांचा सत्कार केला.
भद्रा मारोतीचं घेतलं दर्शन : श्री घृष्णेश्वरसह मंदिरानंतर त्यांनी खुलताबाद येथील भद्रा मारोती (मारुती) मंदिराला भेट देत देवदर्शन केलं. प्रभू श्रीरामाचा संदेश माता सीतेला देण्यासाठी जात असताना हनुमान यांनी विश्रांती घेतलेल्या ठिकाणी, मारुतीची निद्रावस्थेत असलेली मूर्ती विराजमान आहे. दर्शन घेतल्यानंतर जशोदाबेन यांनी नम्रपूर्वक ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे आभार मानले. दरम्यान, जशोदाबेन यांच्या या दौऱ्यामुळं खुलताबाद आणि परिसरातील धार्मिक स्थळांना विशेष महत्त्व प्राप्त झालं, अशी भावना मंदिर विश्वस्तांनी व्यक्त केली. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. तर तहसीलदार स्वरूप कंकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक धनंजय फराटे यांच्या नेतृत्वाखाली कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
हेही वाचा -
- प्रसिद्ध 'घृष्णेश्वर" मंदिरात भाविकांची गर्दी; येथे दर्शन घेतल्याशिवाय १२ ज्योतिर्लिंग यात्रा पूर्ण होत नाही - Grishneshwar Temple Shravan 2024
- सारा अली खाननं घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिराला दिली भेट; पाहा फोटो
- घृष्णेश्वर तीर्थक्षेत्राचा केंद्राच्या 'प्रसाद-२' योजनेत समावेश, मंदिराच्या विकासाला मिळणार चालना