नागपूर : नागपूर शहरात 33 वर्षीय महिलेवर अत्याचार केल्यानंतर तिचा खून करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडलीय. ही घटना गुरुवारी (6 फेब्रुवारी) घडली असून शवविच्छेदनात गळा आवळून महिलेची हत्या करण्यात आल्याचं उघडकीस आलंय. दरम्यान, या घटनेमुळं घरी एकट्या राहणाऱ्या महिलांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय.
नेमकं काय घडलं? : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदरील 33 वर्षीय महिला गेल्या 5 ते 6 वर्षांपासून आपल्या कुटुंबासह नागपूर येथे भाड्याच्या घरात राहत होती. ते मुळचे मध्यप्रदेशातील रहिवासी होते. मात्र, कामासाठी ते नागपुरात राहत होते. घटना घडली त्या दिवशी महिलेचा पती ढाब्यावर कामाला गेला होता. तर मुलगी शाळेत गेली होती. त्यामुळं महिला एकटीच घरी होती. तिला एकटी बघून एक अज्ञात व्यक्ती त्यांच्या घरात घुसला. अज्ञात व्यक्तीनं बळजबरीनं तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर महिला आरडाओरड करेल या भीतीनं त्यानं तिचा गळा आवळून खून केला. त्यानंतर तिथून पळ काढला.
- महिलेची मुलगी संध्याकाळी शाळेतून घरी परतली, तेव्हा तिला आई झोपलेल्या स्थितीत दिसली. यामुळं तिनं आईला उठविण्याचा प्रयत्न केला. परंतु, महिलनेनं प्रतिसाद दिला नाही. यामुळं मुलगी घाबरली. ती रडत-रडत वडिलांकडं गेली. तिनं वडिलांना आई उठत नसल्याचं सांगितलं. घरी आल्यानंतर पत्नीचा मृत्यू झाला असल्याचं महिलेच्या पतीला निदर्शनास आलं.
आरोपीचा शोध सुरू : या घटनेची माहिती मिळताच हुडकेश्वर पोलीस ठाणेदार ज्ञानेश्वर भेदोडकर आणि त्यांचे पथक घटनास्थळी पोहोचले. यावेळी महिलेच्या कानातून रक्त निघत असल्याचं दिसलं. मात्र, कुठेही जखमा नव्हत्या. त्यानंतर या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला. शवविच्छेदनादरम्यान महिलेचा गळा आवळून खून करण्यात आल्याचं उघडकीस आलं. यावरुन अनोळखी व्यक्ती विरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांकडून अज्ञात आरोपीचा शोध घेण्यात येत आहे.
हेही वाचा -