मुंबई :अभिनेत्री कंगना राणौत अभिनीत 'क्वीन' आजही लोकांना खूप पसंत आहे. हा चित्रपट रुपेरी पडद्यावर चांगलाच गाजला होता. 'क्वीन' चित्रपटामध्ये काम केल्यानंतर कंगनाला 'क्वीन ऑफ बॉलिवूड'चा टॅग मिळाला होता. आता अनेकजण 'क्वीन' चित्रपटाच्या सीक्वेलची मागणी करत आहेत. आता दिग्दर्शक विकास बहल यांनी देखील या चित्रपटाच्या सीक्वेलला दुजोरा दिला आहे. 'क्वीन'च्या सीक्वेलबद्दलची बातमी समोर आल्यानंतर चाहत्यांमध्ये आनंदाची लाट उसळली आहे. विकास बहल यांनी बॉलिवूडमध्ये 'चिल्लर पार्टी', 'क्वीन', 'सुपर 30' आणि 'शैतान' यासारखे चित्रपट केले आहेत. 'क्वीन' चित्रपटामधील कंगनाचं राणी पात्र अनेकांना पसंत पडलं होतं.
स्क्रिप्टचे काम पूर्ण झालं : अलीकडेच एका मुलाखतीत, विकास बहल यांनी सांगितलं होतं की,'आम्ही काही काळापासून 'क्वीन 2'वर काम करत आहोत.' दरम्यान कंगना राणौत तिची पुन्हा भूमिका पडद्यावर साकारणार आहे. यावर प्रतिक्रिया देताना तिनं इन्स्टाग्राम स्टोरीवर 'हो' लिहिलं होतं. विकास यांनी चित्रपटाच्या सीक्वेलबद्दल खुलासा करत पुढं म्हटलं होतं, 'क्वीन रिलीज होऊन दहा वर्षे झाली आहेत, आता लोक मला 'क्वीन 2' बद्दल विचारत असतात. मला असं वाटतं की, 'क्वीन' हा चित्रपट कालच प्रदर्शित झाला होता.' मला सांगायला आनंद होत आहे की, आम्ही आमची कहाणी लिहून पूर्ण केली आहे. त्यामुळे त्याचा सीक्वेल बनवला जाणार आहे.'