मुंबई : 2025 या नवीन वर्षात चित्रपटसृष्टीतील अनेक ब्लॉकबस्टर रिलीज होणार आहेत. यामध्ये, सलमान खानचा बहुप्रतीक्षित चित्रपट 'सिकंदर' हा 2025 मधील सर्वात मोठा चित्रपट मानला जातो. दरम्यान शाहरुख खाननं अद्याप 2025साठी त्याच्या नवीन चित्रपटाची घोषणा केलेली नाही. दुसरीकडे आमिर खान देखील सध्या चित्रपटांपासून दूर आहे. मात्र त्याच्या मुलाचा दुसरा चित्रपट 'लवयापा' लवकरच रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. सध्या, राम चरणचा 'गेम चेंजर' आणि कंगना राणौतचा 'इमर्जन्सी' बॉक्स ऑफिसवर सुरू आहेत. तसेच पुढील महिन्यात व्हॅलेंटाईन डेनिमित्त प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
लवयापा :आमिर खानचा मुलगा जुनैद खान आणि श्रीदेवीची मुलगी खुशी कपूर यांचा रोमँटिक कॉमेडी चित्रपट 'लवयापा' 7 फेब्रुवारी रोजी, व्हॅलेंटाईन डेनिमित्त प्रदर्शित होणार आहे. 'लवयापा' हा 2022 मध्ये प्रदर्शित झालेल्या तमिळ चित्रपट 'लव्ह टुडे'चा हिंदी रिमेक आहे.
बैडएस रवि कुमार :संगीत दिग्दर्शक हिमेश रेशमिया आणि प्रभु देवा स्टारर अॅक्शन म्युझिकल चित्रपट 'बैडएस रवि कुमार ' 7 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. हिमेश या चित्रपटात रवी कुमारची भूमिका साकारत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन कैथ गोम्स यांनी केलं आहे. चित्रपटाच्या पोस्टर्स आणि टीझरनं आधीच खळबळ उडवून दिली आहे.
धूम धाम :यामी गौतम आणि प्रतीक गांधी अभिनीत आगामी नेटफ्लिक्स चित्रपट 'धूम धाम'चा मनोरंजक टीझर आज 20 जानेवारी रोजी रिलीज झाला आहे. या चित्रपटात यामी गौतमची दमदार भूमिका प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट 14 फेब्रुवारी रोजी व्हॅलेंटाईन डे रोजी प्रदर्शित होणार आहे. आदित्य धर फिल्म्स आणि ज्योती देशपांडे यांनी संयुक्तपणे या चित्रपटाची निर्मिती केली आहे.
नखरेवाली :राहुल सांकल्याचा रोमँटिक-कॉमेडी चित्रपट 'नखरेवाली' देखील 2025 च्या व्हॅलेंटाईन डे निमित्त रिलीज होत आहे. नीता सतनानी आणि अंश दुग्गल अभिनीत हा चित्रपट 14 फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांना पाहायला मिळेल. या चित्रपटाची कहाणी दिव्या निधी शर्मा आणि संजय त्रिपाठी यांनी लिहिली आहे. 'नखरेवाली' चित्रपटाचे निर्माते आनंद एल राय आहेत, ज्यांनी 'तनु वेड्स मनू'चे दिग्दर्शन केलं होतं.
छावा :विकी कौशल आणि रश्मिका मंदान्ना स्टारर पीरियड ड्रामा चित्रपट 'छावा' देखील व्हॅलेंटाईन डेच्या निमित्तानं बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होणार आहे. याआधी, 'छावा' चित्रपटाचा ट्रेलर 22 जानेवारी रोजी प्रदर्शित होत आहे. हा चित्रपट 14 फेब्रुवारी रोजी व्हॅलेंटाईन डेच्या निमित्तानं विकीच्या चाहत्यांना पाहायला मिळेल. 'छावा' चित्रपटाचे दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर यांनी केलंय. यापूर्वी 'छावा' हा चित्रपट 6 डिसेंबर 2024 रोजी प्रदर्शित होणार होता.