मुंबई - बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा लग्नानंतर परदेशात गेली असली तरी ती देशाची संस्कृती, परंपरा आणि तिची प्रतिष्ठा आजही विसरलेली नाही. प्रियांका लॉस एंजेलिसमधील तिच्या सासरच्या घरी पूजा, होळी आणि दिवाळीसारखे सर्व सण मोठ्या थाटामाटात साजरे करते. प्रियांकानं अमेरिकन गायक निक जोनासशी पूर्ण हिंदू पद्धतीनं लग्न केलंय. हे जोडपं अनेक खासगी, सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमासाठी अधूनमधून भारतात येत असतं. आता प्रियांकानं शेअर केलेल्या इन्स्टाग्रामवरील एक व्हिडिओ पाहून अनेक जण ती भारतात आली असल्याचा दावा करतात. या व्हिडिओमध्ये कारच्या आतमध्ये एक व्यक्ती बसली असून ती कुंभमेळ्याकडे जाणारा रस्ता कारमधून आपल्या मोबाईलमध्ये टिपत असल्याचं दिसतं.
हा व्हिडिओ पाहिल्यानंतर असं दिसतंय की प्रियांका चोप्रा महाकुंभमेळ्याला जात आहे. परंतु या बातमीला दुजोरा मिळालेला नाही. प्रियांका चोप्रा कुंभमेळ्याला जाणार असल्याच्या चर्चा आहेत, कारण गेल्या वर्षी ती तिच्या कुटुंबासह रामलल्लाचं दर्शन घेण्यासाठी राम मंदिरात गेली होती. त्यामळे तिच्या धार्मिक कल लक्षात घेता ती कुंभमेळ्यासारख्या ठिकाणी आवर्जुन हजर राहू शकते. परंतु तिनं अथवा तिच्या कुटुंबीयांनी यावर अजिबात भाष्य केलेलं नाही.
प्रियांका चोप्राच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, गेल्या अनेक वर्षांपासून ती कोणत्याही बॉलिवूड चित्रपटात दिसलेली नाही. प्रियांका २०१६ मध्ये 'द स्काय इज पिंक'मध्ये दिसली होती. प्रियांका चोप्राच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलायचं झालं तर, ती 'द ब्लफ', 'हेड्स ऑफ स्टेट्स', 'सिटाडेल सीझन २' आणि जोनास ब्रदर्सबरोबरच्या 'हॉलिडे' चित्रपटात दिसू शकते. अलिकडेच बातमी आली होती की प्रियांका चोप्रा मेगा-ब्लॉकबस्टर चित्रपट 'बाहुबली २' चे दिग्दर्शक एसएस राजामौली आणि टॉलीवूड प्रिन्स महेश बाबू यांच्याबरोबर 'एसएसएमबी२९' मध्ये दिसणार आहे.