मुंबई -'बिग बॉस 18'चा रोमांचक प्रवास आता संपणार आहे. सलमान खाननं होस्ट केलेल्या शोचा बहुप्रतीक्षित ग्रँड फिनाले आज संध्याकाळी 19 जानेवारी रोजी होत आहे. आज, शोला त्याचा विजेता मिळेल, जो 'बिग बॉस 18'च्या ट्रॉफीसह मोठ्या प्रमाणात रोख रक्कम घेऊन जाईल. अव्वल स्पर्धक बनण्यासाठी सर्व स्पर्धकांनी खूप मेहनत घेतली आहे. या शोच्या प्रत्येक अपडेटबद्दल जाणून घेण्यासाठी प्रेक्षकजण उत्सुक आहेत. दरम्यान या शोमध्ये आज संध्याकाळी, अक्षय कुमार आणि आमिर खानसह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी त्यांच्या आगामी चित्रपटांचे प्रमोशन करण्यासाठी येणार आहेत.
ग्रँड फिनालेमध्ये होणार धमाका :'लाफ्टर शेफ्स'च्या प्रमोशनसाठी बिग बॉसच्या माजी स्पर्धक मन्नारा चोप्रा आणि विकी जैन देखील उपस्थित राहणार आहेत. 'बिग बॉस 18'च्या फिनालेमध्ये 'स्काय फोर्स' चित्रपटातील मुख्य अभिनेता अक्षय कुमार त्याचा सह- कलाकार वीर पहाडियाबरोबर येणार आहे. हा चित्रपट 1965 च्या भारत-पाकिस्तान युद्धावर आधारित आहे. याशिवाय आमिर खानचा मुलगा जुनैद खान आणि दिवंगत श्रीदेवीची मुलगी खुशी कपूर देखील सलमान खानच्या शोमध्ये रोमँटिक-कॉमेडी 'लवयापा'चे प्रमोशन करण्यासाठी येत आहेत. आमिर स्वतः प्रमोशन दरम्यान या शोचा भाग होऊ शकतो. 'लवयापा' या चित्रपटातून आमिर खानचा मुलगा हा मोठ्या पडद्यावर पदार्पण करत आहे. याशिवाय खुशी कपूर देखील या चित्रपटाद्वारे मोठ्या पडद्यावर दिसत आहे. दरम्यान या शोमध्ये 'अंदाज अपना अपना' देखील झलक प्रेक्षकांना पाहायला मिळेल. आमिर खान आणि सलमान खानचा हा चित्रपट खूप गाजला होता. त्यामुळे या चित्रपटामधील काही प्रसिद्ध डायलॉग प्रेक्षकांना ऐकायला मिळेल.