चंद्रपूर : जिल्ह्यात वाघांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून मानव वन्यजीव संघर्ष आता शिगेला पोचला आहे. त्यातच बल्लारपूर-गोंदिया रेल्वे मार्ग हा वाघांसाठी जीवघेणा ठरत आहे. रविवारी (19 जानेवारी) पुन्हा या मार्गावर रेल्वे अपघातात एका वाघाचा मृत्यू झाल्याचे समोर आले. सिंदेवाही तालुक्यातील आलेवाही येथे पॅसेंजर ट्रेनने वाघाला धडक दिली आणि त्यात त्याचा मृत्यू झाला. मागील सात वर्षात आजवर सात वाघांचा रेल्वे अपघातात मृत्यू झाला तर 2025 ची ही पहिली घटना आहे.
रेल्वेच्या धडकेत वाघाचा मृत्यू : बल्लारपूर-गोंदिया हा रेल्वे मार्ग चंद्रपूर जिल्ह्यातील दळणवळण साधनांसाठी महत्त्वाचा मानला जातो.चंद्रपूरच्या बाबुपेठला चांदा फोर्ट रेल्वे स्टेशन आहे. येथून बल्लारपूर ते गोंदिया रेल्वे मार्ग आहे. हा मार्ग चंद्रपूर, मूल, सिंदेवाही, नागभीड तालुक्याला जोडतो. हा मार्ग घनदाट जंगलातून जातो. रेल्वे मार्गाच्या दुतर्फा विस्तीर्ण असे जंगल आहे. त्यामुळे वाघांसह इतर वन्यजीवांचा देखील येथे मुक्तसंचार आहे. मात्र, हा मार्गच आता या वन्यजीवांसाठी मारक ठरत आहे. 2018 पासून जानेवारी 2025 पर्यंत तब्बल सात वाघांचा रेल्वे अपघातात मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. एवढेच नव्हे तर 2 बिबट, तीन चितळ आणि इतर जीवांना देखील यात प्राण गमवावा लागला. याबाबत वनविभागाने रेल्वे विभागाला उपाययोजना सुचविल्या आहेत. मात्र, याचे पालन होत नसल्याने सध्या वन्यजीवांचा रेल्वे अपघातात होणारा मृत्यू हा चिंतेचा विषय बनलेला आहे.
2024 ला तीन चितळांचा मृत्यू : नागभिड तालुक्यातील तळोधी नियतक्षेत्र, गंगासागर हेटी बिट कक्ष क्रमांक 90 मध्ये बल्लारशा-गोंदिया पॅसेंजरच्या धडकेमध्ये तीन चितळे ठार झाल्याची घटना 19 मे 2024 ला उजेडात आली होती. यापैकी एक मादा चितळ हे गर्भावस्थेत असल्याचे आढळून आले.
2023ला बछड्याचा मृत्यू : 27 नोव्हेंबर 2023 ला नागभिड-तळोधी रेल्वे मार्गावर एक तीन महिन्याच्या वाघाचा बछडा मृतावस्थेत आढळुन आला. दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी यांचा 1 डिसेंबर 2023 ला गोंदिया चांदा फोर्ट या रेल्वे मार्गाचा दौरा असताना त्यासाठी गोंदियाहुन विशेष ट्रेन चांदा फोर्टकडे सुरू होती. ही गाडी नागभिड तळोधी येथे आली असताना किटाळी-मेंढा येथे आली. दरम्यान, एक वाघ रेल्वे मार्ग ओलांडत असताना तो वाघ रेल्वेखाली आला. यात या वाघाचा जागीच मृत्यू झाला. रात्रीच्या सुमारास एक वाघीण आपल्या तीन बछड्यांसह रेल्वे मार्गाच्या बाजूला असलेल्या साचलेल्या खड्ड्यात पाणी प्यायला आली होती. या दरम्यान तिच्या बछड्याचा मृत्यू झाला.
सात वर्षांत सात वाघ, 2 बिबट्यांचा मृत्यू : 2018 पासून जानेवारी 2025 पर्यंत चंद्रपूर रेल्वे मार्गावर तब्बल 7 वाघ आणि 2 बिबट्यांचा मृत्यू झाला. नोव्हेंबर 2018 मध्ये लोहाराच्या जंगलात रस्ता ओलांडत असताना तब्बल तीन वाघांच्या बछड्यांचा मृत्यू झाला होता, तर वाघीण देखील जखमी झाली होती. यानंतर 10 ऑगस्ट 2022 ला राजुरा तालुक्यातील चनाखा येथे रेल्वेच्या धडकेत वाघिणीचा मृत्यू झाला, 21 ऑक्टोबर 2022 ला राजुरा तालुक्यातील चूनाळा मार्गावर अपघातात वाघाचा मृत्यू झाला, 27 नोव्हेंबर 2023 ला नागभिड बाळापूर रेल्वे मार्गावर एका तीन महिन्याच्या वाघाचा मृत्यू झाला, तर 8 ऑक्टोबर 2019 मध्ये सावली चिखली मार्गावर एका बिबट्याचा मृत्यू झाला. 7 मार्च 2023 ला विद्युत तारांच्या संपर्कात आल्याने बिबट्याचा मृत्यू झाला होता. आता रविवारी 19 जानेवारीला पुन्हा एका वाघाचा मृत्यू झाला. वनविभागाने घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.
हेही वाचा -