मुंबई : सैफ अली खान हल्ला प्रकरणी मुंबई पोलिसांनी अटक केलेला आरोपी बांगलादेशी असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. मात्र पोलिसांनी हा दावा सिध्द करण्याच्या दृष्टीने कोणतेही पुरावे, कागदपत्रे सादर केली नसल्याची माहिती वकिलांनी दिली.
पोलिसांचा दावा फेटाळून लावला : सैफ अली खानच्या घरात घुसून हल्ला करण्याच्या प्रकरणात पोलिसांनी आरोपी मोहम्मद शहजादला अटक केली. हा आरोपी बांगलादेशी नागरिक असल्याचा दावा पोलिसांनी केला. मात्र, हा आरोपी पाच ते सहा महिन्यांपासून भारतात राहत नसून प्रत्यक्षात पाच ते सहा वर्षांपासून भारतात राहत असल्याचा दावा आरोपीच्या वकिलांनी केलाय. आरोपीचे वकील दिनेश प्रजापती आणि संदीप यांनी पोलिसांचा दावा फेटाळून लावला आहे. त्याच्याकडं पश्चिम बंगालच्या निवासाचा पुरावा असल्याचं वकिलांचं म्हणणं आहे. पोलिसांनी तो बांगलादेशी असल्याचा पुरावा न्यायालयात सादर केलेला नाही, असं वकिलांनी सांगितलं.
आरोपीने जीवे मारण्याची धमकी दिली नव्हती : आरोपी बांगलादेशी असल्यानं या प्रकरणी आंतरराष्ट्रीय कारस्थान असल्याचा पोलिसांचा संशय आहे. मात्र, आरोपी बांगलादेशी नसल्यानं हा संशय चुकीचा असल्याचं वकीलाचं म्हणणं आहे. अटक करताना सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्वांचं उल्लंघन पोलिसांनी कोणतीही नोटीस न देता त्याला अटक केल्यानं सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्वांचं उल्लंघन झाल्याचा दावा वकिलांनी केलाय. तसेच आरोपी विरोधात हत्येचा प्रयत्न या भारतीय न्याय संहितेच्या कलम 109 वाढवण्याबाबत त्यांनी आक्षेप नोंदवला. आरोपीने सैफ अली खानला कोणत्या प्रकारे जीवे मारण्याची धमकी दिली नव्हती. त्याचा तसा उद्देश नव्हता आणि तक्रारीत देखील तसं नमूद करण्यात आलं नाही, याकडं वकिलांनी लक्ष वेधलं आहे. त्यामुळं हे कलम लावता येणार नाही असे वकिलांचं म्हणणं आहे.
कागदपत्रे न्यायालयात सादर केले नाही : पोलिसांनी आरोपीकडून हल्ला करताना वापरण्यात आलेले शस्त्र जप्त करायचे आहे. तसेच हल्ल्यावेळी वापरण्यात आलेल्या कपड्यांवर रक्ताचे डाग असतील त्यामुळं ते कपडे देखील जप्त करायचे आहेत, अशी भूमिका न्यायालयात मांडली. मात्र आम्ही पोलिसांच्या दाव्याला विरोध केला आणि 14 दिवसांची पोलीस कोठडी मागण्यासाठी ही पुरेशी कारणे नसल्याचं न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलं, असं आरोपीचे वकील म्हणाले. या प्रकरणात कोणतीही चोरी झालेली नाही, जो तपास आहे तो पूर्ण झालेला आहे. तसेच हल्ल्यावेळी वापरण्यात आलेला चाकू देखील पोलिसांनी जमा केला आहे. आरोपी बांगलादेशी असल्याचा पोलिसांचा दावा असला तरी पोलिसांनी त्यासाठी आवश्यक असलेला कोणताही पुरावा किंवा कोणतेही कागदपत्रे न्यायालयास सादर केले नाही असं वकिलांनी स्पष्ट केलं.
हेही वाचा -