मुंबई : चित्रपट अभिनेता सैफ अली खान यांच्या घरात घुसून चोरी करणाऱ्या आणि हल्ला करणाऱ्या आरोपीला ठाण्यातील हिरानंदानी इस्टेट परिसरातून पकडण्यात पोलिसांना यश आलंय. अटक करण्यात आलेला आरोपी बांगलादेशी नागरिक असल्याचा पोलिसांना संशय आहे. सुरुवातीला हा आरोपी गेल्या पाच-सहा महिन्यांपासून मुंबईत राहत असल्याचं पोलिसांनी सांगितलं होतं. मात्र न्यायालयात पोलिसांनी दाखल केलेल्या रिमांड अर्जामध्ये हा आरोपी गेल्या पाच-सहा वर्षांपासून मुंबईत बेकायदा पद्धतीनं राहत असल्याचं सांगण्यात आलं. पकडण्यात आलेला आरोपी बांगलादेशी असल्याचं पोलिसांनी संशय व्यक्त केल्यानं बांगलादेशी नागरिकांविरोधातील कारवाई तीव्र करण्याची मागणी वाढीस लागली आहे.
बांगलादेशी नागरिकांनी विरोधातील कारवाई तीव्र करा : भाजपाचे माजी खासदार किरीट सोमैया यांनी ठाण्यातील हिरानंदानी इस्टेट जवळील कावेसर या भागात जाऊन जिथून या आरोपीला अटक करण्यात आली, त्या भागाला सोमैया यांनी भेट दिली. तिथे त्यांनी काही कामगारांशी संवाद साधला. त्यापैकी बहुसंख्य कामगार बांगलादेशी असल्याचा दावा सोमैया यांनी केला. त्यांच्याकडं केवळ पश्चिम बंगालचं आधार कार्ड असून ते आधार कार्ड देखील बनावट असल्याचा संशय सोमैया यांनी व्यक्त केला. त्यामुळं पोलिसांनी बांगलादेशी नागरिकांनी विरोधातील कारवाई तीव्र करावी अशी मागणी सोमैया यांनी केली.
आव्हाड यांच्यावर साधला निशाणा : सैफ अली खानवरील हल्ल्या प्रकरणाला धार्मिक पैलू असल्याचा आरोप करत या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली होती. आता प्रत्यक्षात अटक करण्यात आलेला आरोपी बांगलादेशी असल्याचं समोर येत असल्यानं सोमैया यांनी आव्हाड यांच्यावर निशाणा साधला. 'जितेंद्र आव्हाड जवाब दो' असं प्रत्युत्तर सोमैया यांनी आव्हाडांच्या पोस्टवर केलंय.
"मुंबई पोलिसांनी बांगलादेशी रोहिंग्यांच्या विरोधातील कारवाई तीव्र करावी. बांगलादेशातील रोहिंग्यांविरोधात मुंबई पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन करावं, या नागरिकांना त्यांच्या मायदेशी परत पाठवा. या प्रकरणातून विरोधकांचा विद्रूप चेहरा पुन्हा एकदा जनतेसमोर आला आहे. आव्हाड यांनी या प्रकरणात जातीयवादी आरोप केले होते. हे शिवरायांच्या विचारांचे हिंदुत्ववादी सरकार आहे. या राज्यात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असल्यानं राज्यात जाती वाद खपवून घेतला जाणार नाही". - चित्रा वाघ, भाजपाच्या महिला प्रदेशाध्यक्ष
सरकार विरोधात आव्हाड अपप्रचार करत आहे : "सैफ अली खान मुस्लिम असल्यामुळं हिंदुत्ववादी सरकारनं त्यांच्या विरोधात हल्ला केला, असा कांगावा आव्हाड यांनी केला. आमच्या सरकार विरोधात अपप्रचार करण्याचा आव्हाड प्रयत्न करत होते. आता तरी गरळ ओकण्याचं प्रकार थांबवा. आता जनतेलाही तुमचे हे भयानक डावपेच समजले आहे आणि त्याचं चोख उत्तर विधानसभा निवडणुकीत तुम्हाला मिळालं आहे. त्यामुळं ही गरळ ओकणे थांबवा", असं चित्रा वाघ यांनी सुनावलं आहे. याबाबत आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
हेही वाचा -