मुंबई - Sridevi Birth Annversary: भारतीय चित्रपटसृष्टीतील दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांचा आज, 13 ऑगस्ट रोजी जन्मदिवस. श्रीदेवीनं वयाच्या चौथ्या वर्षी अभिनयाला सुरुवात केली होती. तिनं तेलुगू, मल्याळम, कन्नड, तामिळ, हिंदीमधील अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तिची गणना हिंदी चित्रपटसृष्टीतील अव्वल अभिनेत्रींमध्ये होते. श्रीदेवीनं आपलं सौंदर्य, नृत्यकौशल्य आणि बहारदार अभिनयाने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. आज ती आपल्यात नाही पण तिच्या चित्रपटांतून चाहत्यांच्या हृदयात सदैव जिवंत आहे. आज श्रीदेवीच्या जन्मदिवसानिमित्त तिचे पती निर्माता बोनी कपूर आणि मुलगी, अभिनेत्री खुशी कपूर भावुक झाले. आपल्या दिवंगत आईची आठवण काढत खुशीनं तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर बहीण जान्हवी कपूरबरोबरचा बालपणीचा फोटो शेअर केला आहे.
श्रीदेवीचा जन्मदिवस :खुशीनं घरामधील एक फ्रेम केलेला फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये श्रीदेवी मुलगी खुशी आणि जान्हवी या फोटोसाठी पोझ देताना दिसत आहे. यात खुशी कपूर खूप गोंडस दिसत आहे, फोटो क्लिक करताना जान्हवीच्या चेहऱ्यावर मजेदार भाव दिसत आहेत. हा फोटो खुशी आणि जान्हवीच्या सर्वोत्तम आठवणींपैकी एक आहे. दुसरीकडे, बोनी कपूर यांनी पत्नीची आठवणीत इंस्टाग्रामवर सुंदर पोर्ट्रेट फोटो पोस्ट केला आहे. यात कॅप्शनमध्ये त्यांनी 'हॅपी बर्थडे मेरी जान' असं लिहिलं आहे. हा फोटो श्रीदेवीच्या 2012 मध्ये आलेल्या कॉमेडी-ड्रामा चित्रपट 'इंग्लिश विंग्लिश'मधील आहे. बोनी कपूर यांनी पोस्ट शेअर करताच कमेंट सेक्शनमध्ये लोकांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. दरम्यान या पोस्टवर संजय कपूरनं प्रतिक्रिया दिली आहे. त्यानं कमेंट सेक्शनमध्ये लाल हार्ट इमोजी पोस्ट केले आहेत. त्याचबरोबर इतर चाहत्यांनीही श्रीदेवीची आठवण काढून तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.