सिंधुदुर्ग : कुडाळ मालवण मतदारसंघाचे माजी आमदार वैभव नाईक (Vaibhav Naik) यांच्या मालमत्तेच्या अनुषंगानं लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, रत्नागिरी यांच्याकडून चौकशी सुरू होती. आता याप्रकरणी पुन्हा चौकशीकामी जबाब नोंदविण्यासाठी वैभव नाईक आणि त्यांची पत्नी स्नेहा नाईक यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग रत्नागिरी येथे 11 फेब्रुवारी रोजी उपस्थित राहण्याबाबत पत्र पाठवलं आहे. नाईक यांना यापूर्वीही अनेकदा नोटीस पाठवण्यात आली होती आणि चौकशीही करण्यात आली होती. त्याचबरोबर नाईक यांच्या मालमत्तेची तपासणी करण्यात आली होती. तसेच त्यांच्या संबंधित नातेवाईक, मित्र यांचीही चौकशी करण्यात आली होती. याच पार्श्वभूमीवर पुन्हा नोटीस बजावण्यात आल्यानं खळबळ उडाली आहे.
पत्रात काय आहे? : या पत्रात म्हटलं आहे की, "उपरोक्त संघर्भाधीन विषयान्वये आपणास कळविण्यात येते की, आपल्या मालमत्तेच्या अनुषंगानं लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, रत्नागिरी कार्यालयाकडून उघड चौकशी करण्यात येत आहे. सदर उघड चौकशीच्या अनुषंगानं आपण ५ डिसेंबर २०२२ रोजी ACB कार्यालय रत्नागिरी येथे आपली पत्नी स्नेहा वैभव नाईक यांच्यासह उपस्थित राहिलात. परंतु, लोकप्रतिनिधी कालावधीतील आपली मालमत्ता, उत्पन्न व खर्च याबाबत परिपूर्ण माहिती त्यावेळी उपलब्ध नसल्याने सदर माहिती आपण मागाहून सादर करणार असलेबाबत समक्ष सांगितल्याने तसा त्यावेळी प्राथमिक स्वरुपात आपला जबाब नोंदविण्यात आला नव्हता, तो नोंदविण्यात येणार आहे."
याआधी राजन साळवी यांना नोटीस : काही दिवसांपूर्वीच ठाकरेंच्या शिवसेनेचे राजापूर मतदारसंघाचे माजी आमदार राजन साळवी यांना नोटीस बजावण्यात आली होती. पण त्यानंतर त्यांनी भाजपामध्ये जाण्याचं निश्चित केलं होतं. मात्र, अद्याप प्रवेश निश्चित झाला नाही, मात्र आता नाईक यांना नोटीस दिल्यानंतर आता ते काय भुमिका घेणार हे बघावं लागणार आहे. मात्र, नोटीस आल्यानंतर अद्यापपर्यंत त्यांनी आपली भूमिका जाहीर केली नाही. असं असलं तरी ते या चौकशीला सामोरे जाणार असल्याचं त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात आलं आहे. मात्र, या लाचलुचपतच्या नोटीसीमुळं सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकारणात पुढील काही दिवसात आरोप प्रत्यारोप रंगणार यात मात्र शंका नाही.
हेही वाचा -
- कोकणात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसणार? आमदार वैभव नाईक आणि मंत्री रवींद्र चव्हाणांची भेट, चव्हाणांच्या 'त्या' वक्तव्यानं भुवया उंचावल्या
- किरण सामंतांची माघार ही नारायण राणे यांनी दम दिल्यामुळेच - आमदार वैभव नाईक यांची टीका - Lok Sabha Election 2024
- Vaibhav Naik on Narayan Rane : उद्धव ठाकरे यांनाच नाही तर शिवसेनेच्या कोणत्याही लोक प्रतिनिधीला अडवून दाखवा - वैभव नाईक