मुंबई - दिग्गज अभिनेत्री उपासना सिंगनं कपिल शर्माच्या शोमध्ये बुआजीची भूमिका करून अनेकांची मन जिंकली आहेत. एक काळ असा होता, जेव्हा कपिलच्या शोमध्ये तिची एन्ट्री अनेकांना आवडत होती. उपासना सिंगनं टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत काम केलं आहे. या अभिनेत्रीनं 'जुदाई', 'मैं प्रेम की दिवानी हूं' आणि कॉमेडी नाईट्स विथ कपिल सारख्या मोठ्या प्रोजेक्ट्सवर काम करून आपली एक वेगळी ओळख चित्रपटसृष्टीत निर्माण केली आहे. तिच्यासाठी इतकं मोठं पद गाठणं सोपं नव्हतं. तिनं तिच्या कारकिर्दीत वाईट काळही पाहिला आहे. उपासना सिंग देखील कास्टिंग काउचची बळी ठरली आहे.
उपासनानं केला खुलासा : दरम्यान बॉलिवूड व्यतिरिक्त, उपासनानं पंजाबी चित्रपटांमध्येही काम केलं आहे. सध्या ती निर्माती म्हणून काम करत आहे. सर्वांना हसवणारी उपासनानं तिच्या कास्टिंग काउच अनुभवाबद्दल एक खुलसा केला आहे. कास्टिंग काउचचा बळी होण्यापासून ती कशी थोडक्यात बचावली, याबद्दल तिनं सांगितलं. तिनं एका संवाददम्यान म्हटलं, "एका साऊथ दिग्दर्शकानं मला अनिल कपूरसोबतच्या चित्रपटासाठी साइन केलं होतं. मी अनेकदा माझ्या आई आणि बहिणीबरोबर कोणत्याही दिग्दर्शकांना भेटायला जात होते. एक दिवस त्यांनी मला विचारलं की, तू नेहमी कोणाला तरी सोबत घेऊन का येत असते? यानंतर मला रात्री 11.30 वाजता एक फोन आला. मला हॉटेलमध्ये सीटिंगसाठी येण्यास सांगितलं होतं. मी म्हणाले की, मी दुसऱ्या दिवशी गोष्ट ऐकेन. माझ्याकडे तिथे येण्यासाठी गाडी नाही. यावर तो म्हणाला, तुम्हाला सिटिंगचा अर्थ माहित नाही का?"
खोलीचा दरवाजा सात दिवस बंद : यानंतर उपासनानं पुढं सांगितलं, "माझे सरदारनी मन सक्रिय झाले. दुसऱ्याच दिवशी मी तीन-चार लोकांसह वांद्रे येथील त्याच्या ऑफिसमध्ये पोहोचले. तो दिग्दर्शक मिटिंगमध्ये काही लोकांबरोबर बसला होता. मी थेट त्याच्याशी बोलू लागले, पंजाबी भाषेत. मी त्याला 5 मिनिट शिवीगाळ केली. मला ऑफिसमधून बाहेर पडल्यावर जाणवलं की मी खूप लोकांना सांगितलं होतं, मी अनिल कपूरबरोबर चित्रपटात काम करणार आहे. यानंतर मी फुटपाथवर चालताना खूप रडले. हे सर्व घडल्यानंतर, मी सात दिवस माझ्या रुमचा दरवाजा उघडला नाही." मी सतत रडत होते. मी लोकांना काय सांगू हा विचार करत होते. यावेळी मला माझ्या आईनं साथ दिली. यानंतर मी विचार केला की, मी चित्रपटसृष्टी सोडणार नाही.' आता उपासना सिंग सांगितलेली ही घटना समोर आल्यानंतर तिचे चाहते तिला पाठिंबा देत आहेत.