मुंबई : बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणाचा सातत्यानं पाठपुरावा करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आज (4 फेब्रुवारी) पुन्हा एकदा मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केलेत. "धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना पावणे तीनशे कोटीचा घोटाळा झाला होता," असा आरोप त्यांनी केलाय.
नेमकं काय म्हणाल्या अंजली दमानिया? : अंजली दमानिया यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्या म्हणाल्या की, "धनंजय मुंडे यांनी ते कृषिमंत्री असताना सर्व नियम पायदळी तुडवून नियमबाह्य पद्धतीनं मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या सह्या घेऊन योजना राबवल्या आहेत. तसंच अनेक कृषी योजनांमध्ये चुकीच्या पद्धतीनं निविदा काढून त्याचे कंत्राट दिले. त्यांनी अनेक कृषी योजनांमध्ये मोठा घोटाळा केला. धनंजय मुंडेंनी कृषी मंत्री असताना एकूण पावणे तीनशे कोटींचा घोटाळा केलाय. त्यामुळं आता तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडेचा राजीनामा घेऊन त्यांची चौकशी करावी."
मुंडेंनी शेतकऱ्यांचे 70% पैसे खाल्ले : पुढं त्या म्हणाल्या, "धनंजय मुंडे यांनी शेतकऱ्यांचे 70 टक्के पैसे खाल्ले. कच्च्या मालासाठी अग्रीम रक्कम दिली. बॅक डेटेड पत्र काढण्यात आले. यात अनेक शेतीतील अवजारे, उपकरणे यांच्या खरेदीत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करण्यात आला. तसंच वेगवेगळ्या पद्धतीनं योजना त्यांनी शेतकऱ्यांचे पैसे लाटले आहेत. त्यामुळं असे मंत्री पदावर राहण्याच्या योग्यतेचे आहेत का? हे पाहून त्यांच्यावर तत्काळ कारवाई करण्यात यावी," अशी मागणी त्यांनी केली.
अजित पवार आणि शिंदेंची सही मिळवली : "धनंजय मुंडे आपल्या पक्षाचे असल्यामुळं अजित पवारांनी निविदा पत्रावर सही केली. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या पत्रावर सही केली. त्यामुळं या दोघांची सही घेऊन धनंजय मुंडे यांनी योजना राबवल्या आहेत. यातून कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार करण्यात आला," असा गंभीर आरोप अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे यांच्यावर केला.
निविदा कुणाला द्यायचं हे आधीच ठरलं : पुढं त्या म्हणाल्या, "ही निविदा सहा लोकांना देण्यात आली होती. त्यातील दोघांना बाद ठरवण्यात आलं. चार जणांना या निविदा देण्यात आल्या आहेत. त्यातील तीनजण हे इंदूरमधील आहेत. तर, एक व्यक्ती हा गुजरातमधील आहे. जसे कच्च्या मालाचे आधीच पैसे दिले, तसंच निविदा कुणाला द्यायची हे आधीच ठरलेलं होतं का? त्यामुळं याची चौकशी झालीच पाहिजे." तसंच भगवानगडावरील नामदेव शास्त्री यांनी धनंजय मुंडे यांना पाठिंबा दिला होता. मात्र, आता माझ्याकडं भ्रष्टाचाराचे पुरावे आहेत. त्यामुळं भगवानगडानं आता त्यांचा पाठिंबा काढून घ्यावा. त्यांच्या राजीनामाची मागणी करावी, असंही त्या म्हणाल्या.
- दमानिया यांनी पत्रकार परिषदेत केलेल्या आरोपावर मंत्री धनंजय मुंडे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. धनंजय मुंडे म्हणाले, "माझ्यावर कोण मीडिया ट्रायल करतयं माहिती नाही. दमानियांचे सर्व आरोप खोटे आहेत. दमानियांचे आरोप धादांत खोटे आहेत. डीबीटीबाबत सर्व अधिकार मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना आहेत."
हेही वाचा -