मुंबई - Salman Khan New Mass Action Movie :हिंदी चित्रपटसृष्टीचा 'भाईजान' सलमान खानच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. त्याचा आणखी एक चित्रपट रुपेरी पडद्यावर येणार आहे. सलमान खान साऊथचा पॉवरफुल डायरेक्टर ए.आर. मुरुगादासबरोबर एक मास ॲक्शन फिल्म घेऊन येत आहे. निर्माता साजिद नाडियाडवाला या चित्रपटाची निर्मिती करत आहे. साजिद नाडियाडवालानं सलमानबरोबर 'जीत', 'जुडवा', 'हर दिल जो प्यार करेगा', 'मुझसे शादी करोगी', 'जान ए मन' आणि 'किक' सारखे चित्रपट केले आहेत. सलमान आणि साजिद यांनी शेवटी 2014 रोजी 'किक' या चित्रपटात एकत्र काम केलं होतं.
सलमान खानचा आगामी चित्रपट : आता 10 वर्षांनंतर ही हिट जोडी पुन्हा एकदा एकत्र येत आहे. या चित्रपटामध्ये सलमान पुन्हा एकदा ॲक्शन करताना दिसणार आहे. साजिद नाडियाडवाला यांनी सलमान खानबरोबर असणाऱ्या या दमदार ॲक्शन चित्रपटासाठी दिग्दर्शक ए.आर. मुरुगादास यांची निवड केली आहे. हा चित्रपट 2025 मध्ये ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार साजिद आणि दिग्दर्शक ए.आर. मुरुगादास यांनी मास ॲक्शन चित्रपटाविषयी चर्चा केली आहे. हा एक ग्लोबल ॲक्शन एंटरटेनर चित्रपट असेल. या चित्रपटाचं चित्रीकरण अनेक देशांमध्ये केलं जाणार आहे. सलमान खान स्टारर या चित्रपटाचं बजेट बजेट 400 कोटी असल्याचं सांगितलं जात आहे.