सोलापूर : ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या (Sri Siddharameshwar Maharaj) प्रति अखंड श्रद्धा असणाऱ्या म्हैसुले येथील रायबारी दामोदर पंडित यांनी आषाढ सोमवारी 'रामनाथा'स म्हणेज (श्री सिद्धरामेश्वर महाराजांना) एक कोटी प्रणाम करतो, अशा आशयाचे मराठी भाषेतील (देवनागरी लिपी) शिलालेख सोलापुरातील भुईकोट किल्ल्यामध्ये (Solapur Bhuikot Fort) उपलब्ध आहे. विशेष बाब म्हणजे श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या नावाचा उल्लेख असलेला किल्ल्यातील हा एकमेव शिलालेख आहे.
कपिलसिद्ध मल्लिकार्जुन मंदिराची निर्मिती : शिलालेखात उल्लेख केल्यानुसार 'रामनाथ' म्हणजे सोलापूरचे श्री सिद्धरामेश्वर महाराज होय. कारण श्री सिद्धरामेश्वर महाराज हे एक महाशिवयोगी कुलचक्रवती होते. त्यांनी श्रीशैल यात्रा करून सोलापुरात आल्यानंतर आपल्या परमदेवतेचे म्हणजेच श्री कपिलसिद्ध मल्लिकार्जुनाच्या मंदिराची निर्मिती सोलापुरातील भुईकोट किल्ल्यामध्ये केली. स्वतः सिद्धेश्वर महाराजांनी या मंदिरामध्ये स्वहस्ते शिवलिंगाची प्रतिष्ठापणा केली. या मंदिराचं नाव 'श्री कपिलसिद्ध मल्लिकार्जुन मंदिर' असं ठेवलं.
शिलालेखावर श्री सिद्धरामेश्वर नावाचा उल्लेख : मंदिराच्या उभारणीसाठी अनेकांकडून देणग्यांचा वर्षाव झाला. अनेक प्रतिष्ठित अधिकारी, श्रीमंत सावकार, व्यापारी मंडळींनी गावं, शेततळे इनामी दिले. त्यात अनेक शिलालेखात महाराजांच्या श्री सिद्धरामेश्वर नावाचा उल्लेख 'रामनाथ' या शब्दात करण्यात आला. त्या सर्व घटनांची नोंद अनेक ठिकाणी सापडलेल्या शिलालेखांतून स्पष्ट झाली आहे. ज्येष्ठ इतिहास संशोधक, शिलालेख तज्ज्ञ स्व. आनंद कुंभार यांच्या संशोधनातून हे पुढे आले आहे. हे शिलालेख सुमारे ४०० ते ५०० वर्षांपूर्वीचे असल्याचाही अंदाज व्यक्त केला जात आहे.
काय आहे इतिहास? : सोलापूरकरांचं ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर महाराज आहेत. सोलापूरचे मूळ नाव 'सोनलगी' हे आहे. सिद्धरामेश्वर हे १२ व्या शतकातील महान संत आणि समाजसुधारक होते. त्यांनी सोलापुरात ६८ लिंगांची आणि अष्टविनायक गणपतीची स्थापना केली. श्री. कपिलसिद्ध मल्लिकार्जुन हे त्यांचं आराध्य दैवत होतं. कर्माला महत्त्व देणाऱ्या सिद्धरामेश्वरांनी आपल्या आयुष्यात लोकोपयोगी कार्य केलं.
श्री सिद्धरामेश्वर हे सोलापूरचं ग्रामदैवत आहे. भुईकोट किल्ला हा सोलापूर जिल्ह्याचं वैभव आहे. या किल्ल्यात उपलब्ध असलेल्या शिलालेखात एका भक्तानं श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या श्रद्धेपोटी एक कोटी दंडवत घातल्याचं वर्णन करण्यात आलं आहे. या शिलालेखातून भक्ताची भगवंता प्रति असलेली श्रद्धा दिसून येते. - नितीन अणवेकर, इतिहास अभ्यासक.
हा शिलालेख भुईकोट किल्ल्यात नेमका कोठे? : हा शिलालेख भुईकोट किल्ल्यात प्रवेश करण्यासाठी असणाऱ्या दुसऱ्या प्रवेशद्वाराच्या एकदम समोरील बाजूस जरा उंचवट्यावरून पायवाट जाते. शनिश्वर मंदिराच्या मागील बाजूस दोन तटबंदीमधील बाजूने सरळ वर चालत पुढे गेल्यावर तटाच्या आतील भिंतीस फांजीवर चढण्यासाठी चार पायऱ्या आहेत. तेथेच या भिंतीमध्ये हा शिलालेख बसवला आहे.
श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या नावाचा उल्लेख : भुईकोट किल्ल्यामध्ये १५ शिलालेख आहेत. यामध्ये मोडी, पर्शियन, उर्दू, देवनागरी भाषेतील शिलालेख आहेत. त्यातील एक मराठी भाषेतील असणाऱ्या शिलालेखामध्ये स्पष्ट शब्दात श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या नावाचा उल्लेख असलेला किल्ल्यातील एकमेव शिलालेख आहे.
हेही वाचा -