मुंबई - जगप्रसिद्ध तबलावादक झाकीर हुसेन यांचं वयाच्या ७३ व्या वर्षी सॅन फ्रान्सिस्को इथं निधन झालं. 15 डिसेंबर रोजी त्याच्या कुटुंबीयांनी त्याच्या मृत्यूची बातमी दिली. झाकीर हुसेन यांचा मृत्यू इडिओपॅथिक पल्मोनरी फायब्रोसिसमुळं झाल्याचं त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितलं. तब्बल चार दिवसांनंतर भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरला उस्ताद झाकीर हुसेन यांच्याबरोबर घालवलेल्या सुंदर क्षणांची आठवण झाली आणि त्यानं एक व्हिडिओ पोस्ट केला आहे.
गुरुवारी सचिन तेंडूलकरनं त्याच्या इंस्टाग्रामवर एक जुना आठवणीतील व्हिडिओ शेअर केला. यामध्ये तो हार्डवुड टंग ड्रम शिकताना दिसत आहे. दिवंगत संगीतकार उस्ताद झाकीर हुसेन अतिशय सुलभपणे हे नादमय वाद्य वाजवताना दिसताहेत, तर सचिन त्यांना फॉलो करत हे वाद्य शिकण्याचा प्रयत्न करत आहे. यादरम्यान झाकीर हुसेन त्याला हार्डवुड टंग ड्रम वाजवण्यास मदत करताना दिसत आहे. पण, सचिनला हे तंत्र पकडता येत नाही. हा व्हिडिओ शेअर करताना सचिनने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'उस्तादबरोबरच्या आठवणी!'
15 डिसेंबर रोजी बातमी आली की उस्ताद झाकीर हुसेन यांनी या जगाचा निरोप घेतल्याची बातमी येऊन थडकली. त्यांना दोन आठवडे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. प्रकृती खालावल्यानं त्यांना आयसीयूमध्ये हलवण्यात आलं होतं. त्यांच्या पश्चात पत्नी अँटोनिया मिनेकोला आणि मुली अनिसा आणि इसाबेला कुरेशी असा परिवार आहे.
झाकीर हुसेन हे त्यांच्या पिढीतील सर्वोत्तम तबलावादक म्हणून ओळखले जात होते. झाकीर हुसेन यांच्या निधनावर चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी शोक व्यक्त केला. यामध्ये बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार, साऊथ सुपरस्टार कमल हासन, प्रसिद्ध संगीतकार एआर रहमान यांच्यासह अनेक सेलिब्रिटींच्या नावाचा समावेश आहे. अनेक सेलेब्रिटींना त्याच्या बरोबरच्या संस्मरणीय आठवणी सोशल मीडियावर पोस्ट केल्या आहेत.
भारतातील प्रसिद्ध शास्त्रीय संगीतकारांपैकी एक मानले जाणारे झाकीर हुसेन यांना अनेक मोठ्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं होतं. यामध्ये पद्मश्री (1988), पद्मभूषण (2002) आणि 2023 मध्ये पद्मविभूषण या मोठ्या पुरस्कारांचा समावेश आहे.