छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) - शहरात दोन कोटींसाठी मुलाचे अपहरण केल्याची धक्कादायक घटना शहरातील एन- 4 सिडको भागात मंगळवारी रात्री 8.45 वाजता घडली. बांधकाम व्यावसायिक सुनील तुपे यांच्या सात वर्षीय मुलाचं त्यांच्या डोळ्यासमोर अपहरण करण्यात आलं. ही अपहरणाची घटना सीसीटिव्हीमध्ये कैद झाली आहे. तर काही वेळानं अपहरणकर्त्यांनी निनावी क्रमांकावरून फोन करून दोन कोटींची मागणी केली. या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने नाकाबंदी करत मुलाचा शोध घेण्यासाठी सुरुवात केली आहे.
वडिलांसोबत मुलगा असताना झाले अपहरण- मिळालेल्या माहितीनुसार शहरातील बांधकाम व्यावसायिक असलेले सुनील तुपे रात्री जेवण झाल्यावर घरासमोर फिरत होते. त्यावेळी त्यांचा सात वर्षीय मुलगा त्यांच्यासोबत सायकलवर फिरत होता. वडील पुढे चालत होते. तर मागे त्यांचा मुलगा हा सायकलवर होता. मंगळवार (4 फेब्रुवारी) रोजी रात्री 8.45 वाजता अचानक एक काळ्या रंगाची चारचाकी गाडी मागून आली. त्यातील एकानं चिमुकल्याला आवाज देऊन हाक मारत गाडीकडं बोलावलं. तो तिथे जाताच गाडीतील एकानं सायकलवरून त्याला आत ओढलं. काही कळण्याचा आधी सायकल दुसरीकडं ढकलून देत तिथून पळ काढला. या घटनेत अपहरण करताना वाहनाचे लाईट बंद होते. त्यामुळे ते वाहन येत असल्याची चाहूल सुनील तुपे यांना लागली नाही. त्यांच्या समोरच ही अपहरणाची घटना घडली.
थोड्यावेळानं खंडणीसाठी फोन- घटना घडताच सुनील तुपे आणि कुटुंबीयांनी परिसरात शोध घेतला. मात्र कोणीही आढळून येत नसल्यानं पुंडलिक नगर पोलिसात धाव घेतली. साधारणतः अर्धा तासानं निनावी क्रमांकावरून त्यांना फोन आला. त्यामधे हिंदी भाषेतून त्यानं 'बच्चा चाहिए, तो दोन करोड लगेंगे' अशी मागणी केली. त्यामुळे पैशांसाठी मुलाचं अपहरण झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान पोलिसांनी परिसरातील सीसीटिव्ही तपासण्याचे काम सुरू केलं. तर जागोजागी नाकाबंदीदेखील केली. तर सायबर विभागानं सुनील तुपे यांच्या मोबाईलवर असलेल्या क्रमांकाचे तपशील तपासण्याचं काम सुरू करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
हेही वाचा-