मुंबई : महाराष्ट्राच्या मातीतील एका प्रेरणादायी सत्यकथेवर आधारित 'झी स्टुडिओज्', 'चॉक अँड चीज फिल्म्स' आणि 'फिल्म जॅझ' निर्मित 'आता थांबायचं नाय!' हा चित्रपट 1 मे पासून संपूर्ण महाराष्ट्रात रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. रस्त्यावरील एका भिंतीवर तीन ठसठशीत रंगांत लिहिलेले 'आता थांबायचं नाय!' हे शीर्षक खूप धमाकेदार आहे. या चित्रपटाची कहाणी देखील जबरदस्त असणार आहे. प्रदर्शित झालेल्या मोशन पोस्टरमधून ऐकू येणारे जादुई संगीत रसिकांना मंत्रमुग्ध आता करत आहे. दर्जेदार मराठी चित्रपट महाराष्ट्रातील रसिकांच्या मनामनात आणि घराघरात रुजवणाऱ्या 'झी स्टुडिओज्'ची प्रस्तुती असलेली ही, या वर्षातील सर्वात मोठी घोषणा आहे.
'आता थांबायचं नाय!' चित्रपटाबद्दल : 'झी स्टुडीओज् मराठी'चे व्यवसाय प्रमुख बवेश जानवलेकर यांनी नुकतीच या चित्रपटाची घोषणा करून एक भेट रसिकांना दिली आहे. 'आता थांबायचं नाय!' या चित्रपटामध्ये प्रेक्षकांना खूप काही वेगळं पाहायला मिळणार आहे. झी स्टुडीओज्', 'चॉक अँड चीज फिल्म्स' आणि 'फिल्म जॅझ' निर्मित 'आता थांबायचं नाय!' या चित्रपटाचं दिग्दर्शन लोकप्रिय अभिनेता शिवराज वायचळ यांनी केलं आहे. प्रेरणादायी सत्यकथेवर आधारित असलेल्या या चित्रपटात प्रमुख भूमिकांमध्ये प्रसिद्ध अभिनेता भरत जाधव, सिद्धार्थ जाधव,श्रीकांत यादव, ओम भुतकर, पर्ण पेठे, प्रवीणकुमार डाळिंबकर, प्राजक्ता हनमघर, किरण खोजे हे दिसणार आहेत. तर एका खास भूमिकेत रोहिणी हट्टंगडी भूमिकेत असेल. याशिवाय या चित्रपटात आशुतोष गोवारीकर यांना आपण पाहणार आहोत.
भरत जाधव आणि सिद्धार्थ जाधव आले एकत्र : 'झी स्टुडिओज्' प्रस्तुत 'आता थांबायचं नाय!' या चित्रपटाचं लेखन शिवराज वायचळ, ओमकार गोखले आणि अरविंद जगताप यांनी केलं आहे. या चित्रपटाच्या निर्मितीसाठी निर्माते उमेश के बन्सल(झी स्टुडिओज्), निधी परमार - हिरानंदानी(चॉक अँड चीज फिल्म्स'), क्रिएटिव्ह प्रोड्युसर - तुषार हिरानंदानी, धरम वालीया(फिल्म जॅझ) हे सर्व एकत्र आले आहेत. आता थांबायचं नाय!' ही सकारात्मक ऊर्जा असणारी ही कहाणी असणार आहे. दरम्यान यापूर्वी भरत जाधव आणि सिद्धार्थ जाधव हे दोन कलाकार 'जत्रा' चित्रपटात एकत्र दिसले होते. त्यांनी प्रेक्षकांना आपल्या विनोदानी खूप हसवलं होतं. आता ही जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.