पालघर : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या डहाणू कार्यालयाने पालघर जिल्हा लगतच्या केंद्रशासित प्रदेशातून होणाऱ्या मद्यतस्करी प्रकरणी कारवाई केली. विदेशी मद्याचे तीनशे बॉक्स आणि आयसर टेम्पो जप्त केला आहे. ३१ लाख ५३ हजार २४० रुपयांचा ऐवज ताब्यात घेण्यात उत्पादन शुल्क विभागाला यश आलं असून यामधील आरोपी मात्र फरार झाला आहे.
विदेशी मद्याची पालघर जिल्ह्यात तस्करी : पालघर जिल्ह्याच्या शेजारी केंद्रशासित प्रदेश तसेच गुजरात राज्य आहे. दीव-दमणची बनावट दारू, तसेच विदेशी मद्याची पालघर जिल्ह्यात तस्करी करून आणली जाते. राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि पोलीस अशा तस्करीवर वारंवार कारवाई करत असतात. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पालघर आणि डहाणू विभागाची संयुक्त गस्त सुरू असते.
डहाणू विभागाची कारवाई : डहाणू विभागाचे उत्पादन शुल्क निरीक्षक सुनिल देशमुख आणि पालघर निरीक्षक अरुण चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली भरारी पथक नेमले होते. या पथकाने मुंबई-वडोदरा द्रुतगती मार्गावरील नरेशवाडी परिसरात सापळा रचला. त्यात कागदी पुठ्ठ्याच्या आड लपवून विदेशी मद्याचे तीनशे बॉक्स आयशर टेम्पो (क्रमांक जीजे-०१सीटी १९४८) तून आणले जात होते. भरारी पथकाने कारवाई करून हा टेम्पो ताब्यात घेतला. दादरा नगर हवेली आणि दमण दीवमध्ये विक्रीसाठी असलेल्या विदेशी मद्याची तस्करी पालघर जिल्ह्यात होत असल्याचं तपासात निष्पन्न झालं आहे.
चालक फरार : आयशर टेम्पो सह ३१ लाख ५३ हजार २४० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला असला, तरी टेम्पो चालक मात्र फरार झाला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त विजय सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली सहआयुक्त प्रसाद सुर्वे, विभागीय आयुक्त प्रदीप पवार, कोकण विभागाचे अधीक्षक सुधाकर कदम, पालघरचे उपअधीक्षक बी. एन. भुतकर यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली आहे. तर फरार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबतचा अधिक तपास राज्य उत्पादन शुल्क विभाग डहाणूचे निरीक्षक सुनील देशमुख हे करत आहेत.
हेही वाचा -