अमरावती : बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात तीन दिवसांपूर्वी जन्माला आलेल्या नवजात बाळाच्या पोटात असणाऱ्या दोन जुळ्या बाळांचे अर्भक मंगळवारी अमरावती येथील सुपर स्पेशालिटी रुग्णालयातील डॉक्टरांनी बाहेर काढले. विशेष म्हणजे अतिशय गंभीर असणाऱ्या या शस्त्रक्रियेनंतर बाळ सुखरूप असल्याची माहिती बालरोग तज्ज्ञ डॉ. उषा गजभिये यांनी दिली.
बुलढाण्यातून 'त्या' बाळाला आणलं अमरावतीत : बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात गर्भवती महिलेच्या बाळाच्या पोटात अर्भक असल्याचं 28 जानेवारीला समोर आलं. अतिशय दुर्मिळ असणाऱ्या या घटनेबाबत सर्वत्र आश्चर्य व्यक्त केलं जात असताना, 31 जानेवारीला त्या बाळाचा जन्म बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात झाला. यानंतर या बाळाला अमरावती येथील सुपर स्पेशालिटी रुग्णालयात हलविण्यात आलं. मंगळवारी बालरोग सर्जन डॉ. उषा गजभिये यांच्या नेतृत्वात डॉक्टरांनी त्या बाळावर शस्त्रक्रिया करून त्याच्या पोटात असणारी तीन इंचाची दोन अर्भक बाहेर काढली.
सव्वा तास चालली शस्त्रक्रिया : "बाळाच्या पोटात आणखी बाळ असल्याचं आधीच स्पष्ट झालं होतं. बुलढाण्यावरून या बाळाला सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यावर त्याची संपूर्ण तपासणी करण्यात आली. या बाळाचं अर्ध पोट चिरून त्याच्या पोटात असणारे दोन अर्भक बाहेर काढण्यात आली. ही शस्त्रक्रिया सव्वा तासापर्यंत चालली. त्या बाळाच्या पोटात वाढलेल्या अर्भकाला दोन हात आणि दोन पाय होते. डोकं मात्र नव्हतं," अशी माहिती डॉ. उषा गजभिये यांनी दिली.
अशी केवळ 33 उदाहरणं : "सुरुवातीला जे काही गर्भाचं फर्टीलायझेशन होतं त्यावेळी ते नॉर्मल आईच्या यूटर्समध्ये इम्प्लांट न होता ते शरीरात इतरत्र डेव्हलप होत असल्यामुळं बाळाच्या पोटात गर्भ राहण्याची शक्यता असते. 2002 च्या पूर्वी आम्ही नागपूर मेडिकल कॉलेजमध्ये अशा स्वरूपाची शस्त्रक्रिया केली आहे. त्यावेळी मात्र बाळाच्या पोटात एकच अर्भक होतं. बाळाच्या पोटात एक अर्भक असण्याच्या महाराष्ट्रात आजवर 270 केसेस समोर आल्यात. बाळाच्या पोटात जुळे अर्भक असणारी ही 33 वी केस आहे," असं देखील डॉ. उषा गजभिये यांनी सांगितलं.
बाळ अतिदक्षता विभागात शिफ्ट : "या शस्त्रक्रियेनंतर बाळाची प्रकृती सामान्य आहे. त्याला जनरल विभागातून अतिदक्षता विभागात शिफ्ट करण्यात आलं," असं डॉ. उषा गजभिये म्हणाल्या.
बाळाला अमरावतीत आणण्याचा निर्णय योग्य : बुलढाणा येथून बाळाला छत्रपती संभाजीनगरमध्ये नेण्याचा विचार सुरू असताना बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉक्टरांनी या बाळाला अमरावतीच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये पाठवण्यासंदर्भात जो काही निर्णय घेतला, तो अतिशय योग्य होता. अमरावतीच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये लहान बाळांच्या संदर्भात उपचाराकरिता अद्यावत अशी व्यवस्था आहे. झालेली शस्त्रक्रिया ही अमरावतीच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलसाठी अतिशय महत्त्वाची आहे. डॉ. उषा गजभिये यांच्यासह बालरोग तज्ञ डॉ. नवीन चौधरी, डॉ. मंगेश मेंढे यांच्यासह परिचारिका असे एकूण दहा जणांच्या पथकाने ही महत्वपूर्ण शस्त्रक्रिया यशस्वी केल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.
हेही वाचा -