मुंबई : करवाढ, शुल्कवाढ, भुर्दंडवाढ नसलेला अर्थसंकल्प मुंबई महापालिकेनं सादर केला. त्यामुळं मुंबईकरांना दिलासा मिळाला. हा अर्थसंकल्प सकारात्मक, विकासाभिमुख आहे. विद्यार्थ्यांपासून ते चाकरमान्यांपर्यंत आणि गरीब कष्टकऱ्यांपासून ते उद्योजकांपर्यंत सर्व वर्गांच्या शिक्षण, आरोग्य, स्वच्छता आदी सुविधांचा यामध्ये विचार झाल्यानं याद्वारे आधुनिक मुंबईचा शुभारंभ होईल, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
काळी जादूबाबत राऊतांना जास्त अनुभव : राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे अधिकृत निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्याबाबत शिवसेना - उबाठा पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी एक खळबळजनक दावा केला होता. "वर्षा बंगल्यात कोणीतरी जादूटोण्याचा प्रकार केल्यामुळं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुन्हा या बंगल्यात राहायला जाण्यास तयार नाहीत," असा दावा संजय राऊत यांनी केला होता. त्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं. काळी जादूबाबत राऊतांना जास्त अनुभव असल्याची प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली.
मुंबईच्या विकासाबाबत राज्य आणि केंद्र सरकार गंभीर : "मुंबईच्या अर्थसंकल्पात ४३ हजार कोटी विकासकामांवर खर्च होणार आहेत. मुंबईच्या विकासाबाबत राज्य आणि केंद्र सरकार किती गंभीर आहे, हे यातून दिसून येतं. अर्थसंकल्पाच्या माध्यमातून मुंबई कात टाकत आहे," असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. "मुंबईतील पर्यटनाला चालना देणारा हा अर्थसंकल्प आहे. मुंबईतील वाहतूक वेगवान करण्यावर अर्थसंकल्पात भर देण्यात आला. बेस्टसाठी १ हजार कोटींची तरतूद करण्यात आली. प्रदुषणमुक्त, खड्डेमुक्त आणि भ्रष्टाचारमुक्त मुंबई हा दिलेला शब्द आम्ही खरा करून दाखवत आहोत," असं शिंदे म्हणाले. मुंबई हे देशाचं फिनटेक कॅपिटल म्हणून आकाराला येत असल्याचं सांगून जगाच्या नकाशावर मुंबई दिमाखानं तळपताना दिसेल, त्याचाच हा शुभारंभ असल्याचे शिंदे यांनी यावेळी सांगितलं. झिरो प्रिस्क्रिप्शन योजना राबवण्याचे निर्देश आयुक्तांना देण्यात आल्याचं शिंदे म्हणाले.
'लंडन आय'च्या धर्तीवर 'मुंबई आय' उभारणार : मुंबईत ३०० एकरचं मोठं गार्डन उभारण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. लंडन आयच्या धर्तीवर मुंबई आय उभारण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिली. विकास कामांवर पूर्वी २५ टक्के खर्च केला जात होता. आता ते प्रमाण ५८ टक्क्यांवर गेले असल्याचं ते म्हणाले. कोळीवाड्यांच्या विकासासाठी २५ कोटींची तरतूद करण्यात आली आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधलं.
समान नागरी कायद्याबाबत निर्णय घेणार : "राज्यात समान नागरी कायदा राबवण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत आपण बैठक घेऊन चर्चा करु आणि निर्णय घेऊ," असं त्यांनी स्पष्ट केलं.
मुंबईला सोन्याची अंडी देणारी कोंबडी समजत होते : "जे मुंबईला सोन्याची अंडी देणारी कोंबडी समजत होते, त्यांना मुंबईचा किती आणि कसा विकास होऊ शकतो, हे आम्ही अडीच वर्षांत दाखवून दिलं," असा टोला शिंदे यांनी ठाकरेंना लगावला. ठेवी मोडल्याचा आरोप चुकीचा असल्याचं स्पष्टीकरण त्यांनी दिलं. विरोधकांना टीका आणि विरोध करण्याऐवजी काम नसल्याचा टोलाही त्यांनी लगावला.
हेही वाचा :