मुंबई : आपण कृषिमंत्री असताना कृषी विभागानं एमएआयडीसी विभागामार्फत केलेल्या खरेदीबाबत अंजली दमानिया यांनी जे आरोप केले ते धादांत खोटे आरोप आहेत व हे आरोप त्यांच्या स्वभावाप्रमाणे केवळ सनसनाटी निर्माण करण्यासाठी केलेले आहेत," असा खुलासा राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी मुंबईत केला. मार्च २०२४ मध्ये राबवण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेवर त्यांनी आक्षेप घेतला. ती प्रक्रिया पूर्णपणे नियमात असून शासनाच्या धोरणांना अनुसरुन करण्यात आली आहे, असं ते म्हणाले.
अंजली दमानियांचे सातत्यानं आरोप : "गेले ५० दिवस अंजली दमानिया माझ्यावर आरोप करत आहेत. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील काही आरोपींची हत्या झाल्याचा आरोप त्यांनी केला होता. केवळ धादांत खोटे आरोप करुन स्वतःची प्रसिद्धी करायची आणि दुसऱ्याला बदनाम करायचं या पलीकडं त्यामध्ये काहीही नाही," असं मुंडे म्हणाले. "गेल्या ५८ दिवसांपासून माझ्यावर मीडिया ट्रायल सुरु आहे. हे का चालू आहे? कशामुळे आहे? कोण चालवतंय? मला माहिती नाही," असंही ते म्हणाले.
अंजली दमानियांना शेतीमधलं कळतं का? : "डीबीटीमध्ये समाविष्ट करण्याचं किंवा वगळण्याचे पूर्ण अधिकार मंत्री, मुख्यमंत्री यांना आहेत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री यांच्या पूर्व मान्यतेनं ही प्रक्रिया अंतिम करण्यात आली आहे. अंजली दमानिया शेतकरी आहेत की नाही, मला माहिती नाही, खऱ्या शेतकऱ्याला माहिती आहे की, शेतीपूर्वी फार मशागत करावी लागते. लोकसभा निवडणूक असल्यानं आचारसंहिता लागण्यापूर्वी आणि मान्सून हंगामाआधी ही खरेदी प्रक्रिया मार्च महिन्यात राबवण्यात आली," अशी माहिती त्यांनी दिली.
नॅनोची किंमत देशभरात एकच : नॅनो खताबाबत सर्वात जास्त प्रोत्साहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गेल्या २-३ वर्षांपासून दिलं आहे. महाराष्ट्रात ४ लाख शेतकऱ्यांना नॅनो खत दिलं आहे. नॅनोची खरेदी केंद्राच्या अखत्यारीतील कंपनीकडून झाली आहे. नॅनोची किंमत देशभरात एकच आहे. मात्र, राज्यात त्यापेक्षा कमी दरात नॅनो खताची खरेदी करण्यात आल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. या प्रकरणात कोणताही खोटेपणा, भ्रष्टाचार झालेला नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
दमानियांनी यापूर्वी अनेकांना बदनाम केलंय : "दमानियांनी यापूर्वी अनेकांना बदनाम करण्याचं काम घेतलं होतं. आता यावेळी मी आहे," असं मुंडे म्हणाले. "स्पर्धात्मक निविदेसाठी निविदा प्रक्रियेला दोन वेळा मुदतवाढ देण्यात आली होती. या प्रक्रियेत भ्रष्टाचार झाला म्हणणं हे राज्यातील जनतेला, शेतकऱ्यांना, माध्यमांना फसवणे आहे," अशी टीका त्यांनी केली. खोटेपणा आणि भ्रष्टाचाराचा आरोप केवळ माझ्या बदनामीसाठी केला जात असल्याचा दावा त्यांनी केला.
दमानियांचे आरोप आतापर्यंत टिकले का? : "बीड जिल्ह्याला, तेथील जनतेला, बहुजन समाजाला बदनाम करण्याचं काम दमानियांनी केलं. त्यांच्या बुद्धीची कीव करावी का?" असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. "फरार आरोपींची हत्या झाल्याचा आरोप केल्यानं त्यांचा खोटेपणा समोर आला. दमानियांनी आजपर्यंत बदनामिया करण्याशिवाय त्यांनी केलेला आरोप राज्यात किंवा कुठेही टिकला आहे का?" हे बघण्याचं आव्हान मुंडेंनी दिलं. त्यांना कदाचित पुन्हा राजकारणात यावेसं वाटत असेल, असा टोला त्यांनी दमानिया यांना लगावला. आम्ही शांत बसलो म्हणजे आम्हाला बोलता येत नाही, आमच्याकडं काहीही नाही, असं नाही, असा इशारा त्यांनी दिला. वादाला वाद नको म्हणून आम्ही गप्प बसलोय, असं ते म्हणाले.
५८ दिवस मीडिया ट्रायल व्हावे का? : "माझ्यावर सातत्याने आरोप करण्याचं काम दमानियांना ज्यांनी कुणी दिले आहे, त्यांना माझ्याकडून शुभेच्छा," असं ते म्हणाले. साप, साप म्हणून भुई थोपटणे, मीडियातून सनसनाटी करणे, एखाद्याविरोधात मीडिया ट्रायल करुन त्याचं राजकीय आणि सामाजिक आयुष्य संपवणं, हे एवढं सोपं नसतं. असं मुंडे म्हणाले. एका माणसाचं, जिल्ह्याचं, गावाचं, जातीचं, ५८ दिवस मीडिया ट्रायल व्हावे का?" असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. मुख्यमंत्र्यांना त्यांचे अधिकार माहित नसतील यावर कोणी विश्वास ठेवेल का? असा प्रतिप्रश्न त्यांनी विचारला. दमानिया ज्यांच्यावर आरोप करत होत्या त्यांच्या दारात जावं लागत आहे, ही चांगली बाब असल्याचे मुंडे म्हणाले.
मी माझी भूमिका मांडली आहे : "मी माझी भूमिका माझ्या पक्षाच्या व्यासपीठावर, राष्ट्रीय अध्यक्षांसमोर स्पष्टपणे मांडली आहे. राज्याच्या मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना माहिती दिली आहे," असं ते म्हणाले. दमानियांनी केलेले आरोप घेऊन एका ठेकेदारानं मुंबई उच्च न्यायालयात याचिका केली होती. मात्र, त्यातील आरोप खंडपीठानं हटवण्यास सांगितल्याचा दावा मुंडे यांनी केला. बहिण भावात पुन्हा वाद लावण्याचे प्रयत्न केले जात असल्याचा दावा त्यांनी केला.
हेही वाचा :