मुंबई - दिग्दर्शक सुकुमार आणि साऊथ स्टार अल्लू अर्जुन यांच्या 'पुष्पा 2: द रुल' चित्रपटानं ओपनिंगच्या दिवशीच नवा इतिहास रचला आहे. 'पुष्पा 2' अधिकृतपणे भारतीय आणि जगभरातील बॉक्स ऑफिसवर सर्वात मोठा ओपनिंग देणारा भारतीय चित्रपट ठरला आहे. 5 डिसेंबर रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झालेला 'पुष्पा 2' चित्रपटानं राजामौली यांच्या भव्या 'आरआरआर' चित्रपटाच्या पहिल्या दिवशीच्या कमाईला मागे टाकत बॉक्स ऑफिसवर नवं रेकॉर्ड केलं आहे.
'पुष्पा 2: द रुल'चे पहिल्या दिवसाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन
SACNL च्या लेटेस्ट अहवालानुसार, 'पुष्पा 2' ने भारतात पहिल्याच दिवशी सर्व भाषांमध्ये मिळून सुमारे 165 कोटी रुपये जमा केले आहेत. अल्लू अर्जुनच्या चित्रपटाने प्रीमियर शोमधून 10.1 कोटींचा व्यवसाय झाला आहे. या शोच्या तिकीटांचे दर काही हजारात होते. अशा प्रकारे, 'पुष्पा 2' ने बॉक्स ऑफिसवर अंदाजे 175.1 कोटी रुपयांची रेकॉर्डब्रेक ओपनिंग केली आहे. राम चरण, जूनियर एनटीआर स्टारर आरआरआर चित्रपटानं पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर 133 कोटी कमावले होते.
'पुष्पा 2' नं हिंदीत 'जवान'लाही टाकलं मागं
'पुष्पा 2' ने शाहरुख खानच्या 'जवान' या हिंदी चित्रपटालाही पहिल्या दिवसाच्या उत्पन्नाच्या बाबतीत मागे टाकले आहे. Sacknilk नुसार, 2023 मध्ये रिलीज झालेल्या किंग खान आणि नयनताराचा 'जवान' चित्रपटानं पहिल्या दिवशी सर्व भाषांमध्ये 75 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. यापैकी केवळ हिंदी व्हर्जनमध्ये चित्रपटाने ६५.५ कोटींची कमाई केली. हा शाहरुख खानचा हिंदीतील आतापर्यंतचा सर्वात मोठा ओपनिंग करणारा भारतीय चित्रपट ठरला होता. आता अल्लू अर्जुनच्या चित्रपटाने किंग खानचा हा रेकॉर्ड मोडला आहे. 'पुष्पा 2' ने हिंदी आवृत्तीत 'जवान' चित्रपटाला मागे टाकत 67 कोटींची कमाई केली आहे.
भारतीय चित्रपटाच्या इतिहासातील सर्वात मोठा ओपनर चित्रपट
भारतीय सिनेमाच्या इतिहासात आरआरआर चित्रपटानं पहिल्या दिवशी जगभरात 223.5 कोटी रुपयांची कमाई केली आहे, त्यानंतर 'बाहुबली 2' चित्रपटानं 214.5 कोटी आणि 'कल्की 2898 एडी'नं 182.6 कोटी रुपये इतकी कमाई केली होती. अनेक व्यापार विश्लेषक 'पुष्पा 2' चित्रपट पहिल्या दिवशी जगभरात 250 कोटी रुपयांच्या वरचा आकडा वर्तवत आहेत. आगामी काळात 'पुष्पा 2' आणखी अनेक विक्रम करेल अशी अपेक्षा आहे.
सुकुमार दिग्दर्शित 'पुष्पा 2' या चित्रपटात अल्लू अर्जुन, रश्मिका मंदान्ना आणि फहद फासिल पुन्हा एकदा त्यांची जुनी पात्रं 'पुष्पा राज', 'श्रीवल्ली' आणि 'भंवर सिंग शेखावत' साकारताना दिसत आहेत.