महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

'कॉन्स्टेबल मंजू' मालिकेत मम्मीसाहेबांचा डाव तिच्यावरच उलटला, नवा रंजक प्रोमो रिलीज - CONSTABLE MANJU SERIAL

Constable Manju serial : 'कॉन्स्टेबल मंजू' मालिकेचा नवा प्रोमो रंजक आहे. यामध्ये मंजू आणि मम्मीसाहेब यांच्यातील संघर्ष पाहायला मिळणार आहे.

Constable Manju serial
कॉन्स्टेबल मंजू (Constable Manju team)

By ETV Bharat Entertainment Team

Published : Oct 25, 2024, 7:42 PM IST

मुंबई - 'कॉन्स्टेबल मंजू' ही नवी मालिका सध्या चर्चेत आहे. यातील पात्रं प्रेक्षकांच्या परिचयाची झाली असून कथानकालाही रंगत आली आहे. या मालिकेचा नवा प्रोमो रिलीज झाला असून यामध्ये कॉन्स्टेबल मंजू हिच्या तोंडाला काळं फासण्याची तयारी मम्मीसाहेबांनी केल्याचं दिसतं.

या मालिकेच्या नव्या प्रोमोमध्ये मम्मीसाहेब कॉन्स्टेबल मंजूच्या विरोधात पोलीस स्टेशनच्या आवारात महिलांचा मोर्चा घेऊन आलेली दिसते. मंजूच्या तोंडाला काळ फासण्यासाठी मम्मीसाहेबांनी बरोबर शाई आणली आहे. पोलीस स्टेशनच्या बाहेर येताच मम्मीसाहेब म्हणते, "ही कॉन्स्टेबल स्वतःच्या नवऱ्याला, सासूला अटक करते आणि हिचा साहेब हिला मेडल देतात थांबा आता मीच मेडल देते" मंजूच्या चेहऱ्यावर शाई फेकण्यासाठी एक बाई सरसावते. एवढ्यात सत्याचा थांबा! असा आवाज येताच त्या बाईच्या हातातली शाईची बाटली मम्मीसाहेब यांच्या चेहऱ्यावर पडते.

बिनधास्त सत्याच्या आयुष्यात मंजूचं आगमन हा रंजक ट्रॅक मालिकेत प्रेक्षकांना आवडताना दिसत आहे. थोडीशी भित्री असलेल्या मंजूची गाठ निडर सत्याशी पडली आहे. त्याच्याच मदतीनं ती अनेक गुन्ह्यांना उघड करत चालली आहे. परंतु मंजूचं असं लोकप्रिय होणं याचा त्रास काही लोकांना होतो. मंजूवर बालंट आलं पाहिजे, तिची नाचक्की झाली पाहिजे यासाठी सातत्यानं प्रयत्न सुरू राहतात, मात्र सत्या मंजूच्या पाठीशी ठाम राहतो आणि डाव उधळून लावतो. कथानकात वाढत जाणारी उत्कंठा कायम ठेवण्यात मालिकेच्या निर्मात्यांना यश आल्याचं दिसतंय.

आता मालिकेच्या कथानकात यापुढे सत्या मंजूच्या बाजूने उभा राहणार का? मम्मीसाहेब मंजूला छळण्यासाठी आणखी कोणता नवा डाव रचणार? हे पाहणं रंजक असणार आहे. 'कॉन्स्टेबल मंजू' ही मालिका सन मराठी वाहिनीवर प्रसारित होत आहे. 'कॉन्स्टेबल मंजू' या मालिकेत मंजूच्या भूमिकेत मोनिका राठी आणि सत्याच्या भूमिकेत वैभव कदम यांच्या मुख्य भूमिका आहेत. या मालिकेतील इतर कलाकारांमध्ये मिलिंद शिंदे, विद्या सावळे, शिवराज नाळे, कल्याणी चौधरी, बीना सिद्धार्थ, ऋतुजा कुलकर्णी, नेहा सावळे आणि निकिता सावळे यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details