मुंबई - बॉलिवूड स्टार कार्तिक आर्यननं अलीकडेच मुंबईतील त्याच्या अल्मा मॅटर, डीवाय पाटील विद्यापीठाला भेट दिली. त्याला कॉलेजच्या दीक्षांत समारंभात पदवी प्रदान करण्यात आली. अभ्यासक्रमात प्रवेश घेतल्यानंतर त्यानं तब्बल 10 वर्षानंतर इंजीनियरिंगची डिग्री मिळवली आहे.
इंस्टाग्रामवर कार्तिकनं एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये त्याचे कॉलेजमध्ये भव्य स्वागत होताना दिसत आहे. त्यानं या पदवी समारंभात केवळ विद्यार्थ्यांशी संवाद साधला नाही तर त्यांच्याबरोबर त्याच्या हिट गाण्यावर डान्सही केला.
"माझ्या दीक्षांत समारंभासाठी बॅकबेंचवर बसण्यापासून ते स्टेजवर उभं राहण्यापर्यंतचा प्रवास,किती छान होता. डीवाय पाटील विद्यापीठ, तुम्ही मला आठवणी, स्वप्नं दिली आणि आता, शेवटी, माझी पदवीही (फक्त एक दशकाहून अधिक काळ झाला!) दिलीत. विजय पाटील सर, माझे शिक्षक आणि येथील स्वप्नं पाहणाऱ्या सर्व तरुणाईच्या प्रेमाबद्दल धन्यवाद - हे घरी आल्यासारखे वाटतंय," असं त्यानं पोस्टच्या कॅप्शनमध्ये म्हटलंय.
कार्तिकच्या या पोस्टला नेटिझन्सकडून भरपूर लाईक्स आणि कमेंट्स मिळाल्या आहेत. व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना एका चाहत्यानं कमेंटमध्ये या सुंदर क्षणाबद्दल लिहिलंय. अनेकांनी त्याची प्रशंसा केली आहे.
दरम्यान, कामाच्या आघाडीवर, २०२४ हे वर्ष कार्तिकसाठी एक उत्तम वर्ष ठरलं आहे. ‘भूल भुलैया ३’ हा हॉरर-कॉमेडी चित्रपट कार्तिकच्या कारकिर्दीला एका उंचीवर नेणारा हिट चित्रपट ठरला. या चित्रपटाची अजय देवगणच्या 'सिंघम अगेन'शी बॉक्स ऑफिसवर टक्कर असूनही जागतिक स्तरावर ४०० कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई झाली.
याउलट, 'चंदू चॅम्पियन'मध्ये कार्तिकने पॅरालिम्पिक चॅम्पियन मुरलीकांत पेटकर यांची भूमिका केली होती. यातील अभिनयासाठी समीक्षकांकडून कार्तिकला प्रशंसा मिळाली. बॉक्स ऑफिसवर चित्रपटाची कामगिरी चांगली झाली नसली तरी, ओटीटी प्लॅटफॉर्मवरील यश आणि आयएफएफएम पुरस्कारासह आंतरराष्ट्रीय पुरस्कार समारंभांमध्ये मिळालेली ओळख यामुळे त्याचा परिणाम अधोरेखित झाला.
आगामी काळात, कार्तिक आर्यन त्याच्या नव्या चित्रपटासाठी सज्ज होत आहे. 'तू मेरी मैं तेरा, मैं तेरा तू मेरी' हा त्याचा पुढील चित्रपट समीर विद्वांस दिग्दर्शित आणि धर्मा प्रॉडक्शन निर्मित आहे. २०२६ मध्ये प्रदर्शित होणारा हा चित्रपट एक आनंददायी रोमँटिक कॉमेडी असणार आहे. याव्यतिरिक्त, कार्तिक प्रशंसित चित्रपट निर्माते अनुराग बसूसोबत आणखी एका शीर्षक ठरले नसलेल्या चित्रपटावर काम करत आहे.