छत्रपती संभाजीनगर : राज्यातील राजकारणात मोठे बदल घडतील, असे संकेत राज्यातील मंत्री देत आहेत. त्यात आता महाविकास आघाडी अस्तित्वात राहणार नाही, असं विधान समाज कल्याण मंत्री संजय शिरसाट यांनी केलं. त्यावर आता विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी स्थानिक पातळीवरील निवडणुकांबाबत वेगळा निर्णय घेण्याबाबत चर्चा झाली, तरी आम्ही सोबत आहोत, असं मत व्यक्त केलं. दोन्ही पवार एकत्र येण्यावरुन संजय सिरसाट यांनी भाष्य केलं. यावर बोलताना संजय शिरसाट हे भविष्यकार असतील, मला माहीत नाही, अशी टीका अंबादास दानवे यांनी केली.
ठाकरे सोबत कोणीही नसल्यानं एकटे : आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक स्वबळावर लढणार असल्याचे संकेत उबाठा नेते खासदार संजय राऊत यांनी दिले. त्यावर "यांच्यासोबत कोणीही नसल्यानं आता त्यांना तसं बोलावं लागत आहे," अशी टीका मंत्री संजय शिरसाट यांनी केली. "त्यांच्याकडं काही उरलं नाही, सोबतचे सोडून जात आहेत. आपल्यासोबत कुणी नाही, एकटं जावं लागेल म्हणून ते आता एकटं निघत आहेत. त्यांना स्वबळावर लढावंच लागेल. काँग्रेस नाही, शरद पवार नाही, म्हणून स्वबळावर, त्यांना आता पर्याय उरला नाही. महाविकास आघाडी संपली, काही उरलं नाही. ठाकरेंना आता सिल्व्हर ओकचे देखील दरवाजे बंद झाले," अशी टीका संजय शिरसाट यांनी केली. तर "राजकारणात कुणी कुणाचा शत्रू नाही, शत्रू ते लोक मानतात, ते मानणारे आता लाचारी पत्करतील. मात्र भाषा बदलून उपयोग नाही. स्वाभिमान शिल्लक असेल, तर स्वतंत्र लढाच", असं आव्हान देखील त्यांनी उबाठाला दिलं.
ठाकरे गटाचा मेळावा चर्चेत : शहरात मंत्री पंकजा मुंडे, उदय सामंत, संजय शिरसाट यांच्या बैठकांचं सत्र सुरू असताना दुसरीकडं उबाठानं घेतलेली बैठक चर्चेचा विषय बनली आहे. "गेल्या काही दिवसात पक्षातून बाहेर पडत असलेल्या नेत्यांमुळे स्थानिक पदाधिकारी पक्षाशी बांधून ठेवण्यासाठी बैठक महत्वाची होती. ही बैठक म्हणजे कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य भरण्यासाठी गरजेची आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न होता. पक्षातून एक दोन जण वगळता कोणी कुठं गेलेलं नाही. राज्यात आमची महाविकास आघाडी अद्याप कायम आहे. कोणाला काय बोलायचं बोलू द्या," अशी टीका विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली. तर दोन्ही पवार एकत्र येण्याबाबत शिरसाट यांनी विधान केलं, त्यावर ते भविष्यकार असतील, माहिती नाही, अशी टीका करत त्यांनी बोलणं टाळलं.
हेही वाचा :
- "एका महिन्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील, पण उद्धव ठाकरे...", नेमकं काय म्हणाले संजय शिरसाट? वाचा सविस्तर
- संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे असल्यास त्यांच्यावरही कारवाई करणार- मंत्री संजय शिरसाट
- अब्दुल सत्तार यांचा पक्षातील नेत्यांना घरचा आहेर; म्हणाले 'एकाला घरी बसवलं, दुसऱ्याला सिल्लोडमध्ये गुंडगिरी दिसते, आता मीच . . . .'