नांदेड : जिल्ह्यातील बिलोली तालुक्यात मन हेलावणारी घटना घडली आहे. कर्जबाजारी शेतकऱ्यानं आपल्या तरुण मुलाला शैक्षणिक साहित्य घेण्यासाठी पैसे न दिल्यानं, मुलानं आत्महत्या केली. मात्र मुलाच्या आत्महत्येचा धक्का सहन न झाल्यानं हतबल पित्यानं देखील तिथंच आत्महत्या केली, अशी माहिती मृताचा भाऊ राजेंद्र पैलवार यांनी दिली. या घटनेमुळं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
काय आहे घटना? : बिलोली तालुक्यातील मिनकी इथं ही घटना घडली आहे. 43 वर्षीय अल्पभूधारक राजेंद्र पैलवार यांच्यावर चार लाखाचं कर्ज होतं. कर्ज आणि सततची नापिकी यामुळं कुटुंबाचा उदरनिर्वाह करणं त्यांना कठीण जात होतं. त्यांचा 16 वर्षीय मुलगा हा उदगीर इथं 11 वीत शिक्षण घेत होता. मकर संक्रांत निमित्त तो गावी आला. नवीन कपडे, शैक्षणिक साहित्य आणि नवीन मोबाईलसाठी त्यानं वडिलांना पैसे मागितले. पण पैसै नाहीत, थोडे दिवस थांब, नंतर देतो असं वडील म्हणाले होते. त्यामुळं नाराज होऊन मुलानं टोकाचं पाऊल उचललं आणि आत्महत्या केली.
वडिलांनी संपवली जीवनयात्रा : मुलगा घरी न आल्यानं वडिलांनी शोधाशोध केली. तेव्हा मुलानं आत्महत्या केल्याचं दिसलं. ते पाहताच हतबल वडिलांनी देखील स्वतःची जीवनयात्रा संपवली. या घटनेनं मिनकी गावात शोककळा पसरली आहे. बिलोली पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोलीस करत आहे.
रिक्षाचालक तरुणानं केली आत्महत्या : या आधीही 4 जानेवारी रोजी पिंपरी चिंचवड शहरात देखील एक आत्महत्या केल्याची घटना घडली होती. शहरातील रिक्षाचालक तरुणानं पत्नी, मुलगा, मुलगी यांची माफी मागत राहत्या घरात आत्महत्या केल्याची घटना घडली. ही घटना चिंचवड स्टेशन येथील साईबाबानगर इथं घडली. रजनी सिंग, राजीव कुमार उर्फ गुड्डू भैया, महादेव फुले आणि हनुमंत गुंडे उर्फ अविनाश गुंडे या चार बेकायदेशीर सावकाराच्या जाचाला कंटाळून मी आत्महत्या करण्याचा अत्यंत चुकीचा निर्णय घेत आहे, असा व्हिडिओ तयार करत आणि सुसाईड नोट लिहित रिक्षाचालक तरुणानं आत्महत्या केली, अशी माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. विशाल हिरे यांनी दिली.
हेही वाचा -