नागपूर : इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाहणी केली. त्यांनी विस्तारीकरणाच्या कामाची पाहणी करुन सुरू असलेल्या विकास कामांची माहिती घेतली. यावेळी त्यांनी संजय राऊत आणि महाविकास आघाडीची पार लक्तरं काढली. संजय राऊत यांच्याबाबत प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांना प्रश्न विचारला. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत रिकामटेकडे आहेत, मला खूप कामं आहेत. राज्य प्रगतीपथावर नेणं हे आमचं ध्येय आहे, अशी जोरदार टीका त्यांनी केली. महाविकास आघाडी तुटली किंवा जोडली गेली, याच्याशी आम्हाला काही देणंघेणं नाही, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.
नागपुरातील सरकारी रुग्णालयाची केली पाहणी : "नागपूरचे दोन्ही मेयो आणि मेडिकल महाविद्यालय हे महाराष्ट्रातील सर्वात जुने मेडिकल कॉलेजेस आहेत. दोन्ही मेडिकल कॉलेजच्या इमारतीला अनेक दशक झाले आहेत. त्यामुळे सर्व इमारती अध्ययावत करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी एक हजार कोटींचा निधी दिला. दोन्ही ठिकाणी कामाची प्रगती पाहण्यासाठी मी आलो होतो. दोन्ही ठिकाणी काम सुरू असून प्रगतीपथावर आहे. गती वाढवण्याची आवश्यकता आहे. काही त्रुटी आढळल्या, त्या दुरुस्त करण्याची आवश्यकता आहे. निधीची कमतरता आम्ही पडू देणार नाही. काम दर्जेदार झालं पाहिजे, अशी अपेक्षा आहे. मी पुन्हा एप्रिल महिन्यामध्ये आढावा घेणार आहे," असं यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे म्हणाले.
महाविकास आघाडीचं आम्हला काही घेणं देणं नाही : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक उद्धव ठाकरे यांचा पक्ष स्वबळावर लढण्याच्या तयारीत असल्याची घोषणा संजय राऊत यांनी केली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाली असल्याचं बोललं जातंय. यावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, की "महाविकास आघाडी राहील की तुटेल याकडं आमचं लक्ष नाही. महाराष्ट्राला प्रगतीकडं नेण्याचा आमचा प्रयत्न आहे."
संजय राऊत रिकामटेकडे, मी रिकामटेकडा नाही : उद्धव ठाकरे मित्र होते, आता राज ठाकरे मित्र आहेत, असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. त्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की "कोण कुठं जाणार, कोण कुठं येणार हे आमचे मित्र देवेंद्र फडणवीस ठरवणार नाहीत." त्याला प्रतिउत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की "त्यांनी त्यांचं मत व्यक्त केलं, मी माझं मत व्यक्त केलं. मी बांधील नाही, त्यांच्या प्रत्येक वक्तव्यावर मत व्यक्त करायला. ते रिकामटेकडे आहेत, ते रोज बोलतात मी रिकामटेकडा नाही."
हेही वाचा :
- "...तर कदाचित अमृतानं माझ्याशी लग्न केलं नसतं", मुलाखतीत 'दिलखुलास देवाभाऊ', विविध प्रश्नांवर मारले षटकार
- आता घरबसल्या करा दस्त नोंदणी ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली 'वन स्टेट, वन रजिस्ट्रेशन' योजना
- त्रिशंकू क्षेत्रातील गावं टाकणार कात; विकास करण्यासाठी महसूल विभाग करणार काम, मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय