मुंबई - गेल्या वर्षी 'स्त्री २' या हॉरर कॉमेडी चित्रपटाच्या निर्मितीनं धमाल उडवणारे दिग्दर्शक अमर कौशिक त्याच्या आगामी 'चामुंडा' चित्रपटावर काम करत आहेत. या चित्रपटासाठी त्यानं शाहरुख खान आणि आलिया भट्ट यांची निवड केली होती. शाहरुख खानचे चाहते या चित्रपटाची आतुरतेनं वाट पाहत आहेत, परंतु मिळालेल्या माहितीनुसार, शाहरुख खाननं चामुंडा चित्रपट करण्यास नकार दिला आहे. जरी या चित्रपटाची घोषणा अद्याप झालेली नसली किंवा त्याची स्टारकास्ट जाहीर झालेली नसली तरी, अशी चर्चा आहे की शाहरुख आणि अमर कौशिक एक हॉरर कॉमेडी चित्रपट करणार होते.
शाहरुख खाननं आता हा चित्रपट करण्यास नकार दिला असल्याचं समजतंय. शाहरुख खान आणि आलिया भट्ट अभिनीत हा हॉरर कॉमेडी चित्रपट आता प्रलंबित आहे. असे म्हटलं जात आहे की शाहरुख खान आणि स्त्री २ चित्रपटाचे निर्माते कोणत्याही गोष्टीवर सहमत होऊ शकले नाहीत. अशा परिस्थितीत चित्रपट लॉक झाल्याचं बोललं जात आहे. मॅडॉक फिल्म प्रॉडक्शन हाऊसला शाहरुख खान आणि आलिया भट्ट यांना घेऊन हा चित्रपट बनवायचा होता, पण आता हा चित्रपट होताना दिसत नाही.
अशा प्रकारच्या जॉनसाठी शाहरुख स्वतःला अनुकुल समजत नाही. त्यामुळं त्यानं फारस रस दाखवलेला नाही. असंही म्हटलं जातंय की, शाहरुखला अमर कौशिककडून या चित्रपटाच्या कथानकात काही बदल हवे आहेत. अशा परिस्थितीत शाहरुख हा चित्रपट दुसऱ्या अँगलनं बनवण्याच्या मनस्थितीत आहे. चामुंडा बद्दल अजून अधिकृतपणे काहीही जाहीर झालेलं नाही. त्यामुळं लोक या चित्रपटावर निर्मात्यांच्या प्रतिक्रियेची वाट पाहत आहेत. शाहरुख खान त्याच्या 'किंग' या आगामी चित्रपटावर काम करत आहे. अभिषेक बच्चन आणि सुहाना खान हे देखील 'किंग' मध्ये दिसणार आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन सुजॉय घोष करत आहे.